माधुरी दीक्षितचा अडीच वर्षांचा मुलगा भावासाठी कोणासोबत नडलेला; अरिन आणि रायनच्या बालपणीचा किस्सा सांगताना अभिनेत्री म्हणाली...
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये माधुरी दीक्षित हिने आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमधील एक माधुरी दीक्षित आहे. ‘देवदास’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कौन’, ‘दिल’, ‘कोयला’, ‘साजन’, ‘तेजाब’ इ. असे माधुरीचे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाला २५ वर्ष झाली आहेत. लग्न झाल्यानंतर माधुरीने अभिनयातून ब्रेक घेतला आणि पुढे ती अमेरिकेत स्थायिक झाली.
काही वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर माधुरी आणि तिचे पती डॉ. नेने भारतात परत आले. माधुरीला दोन मुलं आहेत. जी सध्या लॉस एंजेलिसमधील कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. दरम्यान, डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये डॉ. नेने यांच्या आईने अरिन (वय २१) आणि रायन (१९) या दोन्हीही मुलांबद्दल सांगितलं आहे. व्हिडिओमध्ये डॉ. नेने यांच्या आईने आपल्या नातवांच्या बालपणीचा एक किस्सा शेअर केलेला आहे. व्हिडिओमध्ये, डॉ. श्रीराम नेने, माधुरी दीक्षित, मुलगा अरिन आणि रायन आणि डॉ. नेने यांचे आई- वडिलही चर्चेत सहभागी झाले होते.
डॉ. नेनेंच्या आईने अरिन आणि रायन लहान असतानाचे सांगितले. अरिन रायनला याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, “बालपणी कायमच अरिन त्याच्या लहान भावाची म्हणजेच रायनची खूप काळजी घ्यायचा. अरिन नेहमी म्हणायचा की, ‘रायन माझा भाऊ आहे, तो माझा धाकटा भाऊ आहे.’ रायन कुठेही गेला तरी तू (अरिन) त्याचं रक्षण करायचाच,” असं त्या म्हणाल्या. पुढे या चर्चेत माधुरीने अरिन आणि रायन कसं बालपणी एकमेकांना सांभाळायचे ? तर लहान असताना रायनने दादागिरी करून अरिनला त्रास देणाऱ्या मुलाला कसा विरोध केला ते माधुरीने सांगितलं.
किस्सा सांगताना माधुरी दीक्षितने सांगितले की, “मला आठवतंय, एकदा अरिनला फुटबॉल ग्राउंडवर खेळत असताना एका मुलाने ढकललं होतं. तेव्हा रायन फक्त अडीच वर्षांचाच होता. तो अरिनला धक्का देणाऱ्या मुलासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ‘तू माझ्या भावाशी असं वागू शकत नाही. तुला माहीत आहे का मी कोण आहे? तो कोण आहे माहित आहे का तुला? तो माझा भाऊ आहे…’ ”, असं माधुरीने सांगितलं. हे ऐकल्यावर रायन विनोद करत म्हणाला “आम्ही लहान असतानाच्या कोणत्याही गोष्टी सांगून आई-वडील आम्हाला मूर्ख बनवू शकतात.”
दरम्यान, माधुरी भारतात आल्यानंतर अभिनयक्षेत्रात परतली. तिने अनेक रिॲलिटी शोची जजिंग केली आहे. अनेकदा बॉलिवूडमधील इव्हेंट्सला आणि पार्ट्यांना डॉ. नेने माधुरीसोबत हजेरी लावत असतात. डॉ. श्रीराम नेनेही भारतात आल्यापासून त्यांच्या कामात व्यग्र असतात. माधुरी दीक्षित शेवटची ‘भुल भुलैया ३’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी या कलाकारांसोबत काम केलं होतं.