Filmmaker Mahesh Jirawala Death Confirmed In Ahmedabad Plane Crash Family Accepts His Body After Refusing Initially
अहमदाबाद विमान दुर्घटना होऊन चार दिवस उलटून गेले आहेत. या घटनेचा साधा विचार जरी केला तरी अंगावर काही सेकंदात काटा येतो. या घटनेमध्ये शेकडो लोकं मृत्युमुखी पडले आहेत. या विमान दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची सध्या डीएनए टेस्टच्या माध्यमातून ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. दरम्यान, अशातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, या दुर्घटनेनंतर ३४ वर्षीय प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक महेश कालावाडिया बेपत्ता झाला आहे. महेश त्या एअर इंडियाच्या विमानातही नव्हता किंवा ज्या हॉस्टेलवर ते विमान कोसळलं होतं, त्यातही तो नव्हता. त्या घटनेपासून गायक बेपत्ता असून त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेऊन काळजी व्यक्त करत आहेत.
विमान दुर्घटनेनंतर गायकाच्या कुटुंबीयांनी त्याची रुग्णालय, शवगृह आणि पोलीस ठाण्यात चौकशी केली. परंतु महेशचा कुठेच पत्ता लागत नाही. महेश त्याच्या स्कूटरवरुन घरी येण्यासाठी निघाला होता. विमान दुर्घटनेला आज चार दिवस उलटून गेले तरीही अद्याप त्याच्या कुटुंबीयांना त्याच्याविषयी किंवा त्याच्या स्कूटरविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही. महेशचे कुटुंबीय त्याच्याबद्दल चिंतेत असण्यामागचं मोठं कारण म्हणजे त्याच्या फोनचं शेवटचं लोकेशन… गायकाचं शेवटचं लोकेशन बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलपासून 700 मीटरवर दाखवलं गेलं होतं. त्यानंतर त्याचा फोन स्वीच ऑफ झाल्याचं दाखवलं जात आहे. त्याच्या लोकेशनपासून जवळ असणाऱ्या या मेडिकल कॉलेज हॉस्टेलवरच एअर इंडियाचं हे विमान कोसळलं.
लोकप्रिय संगीत दिग्दर्शक महेशचा छोटा भाऊ कार्तिक याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, “गुरुवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास महेशने पत्नी हेतलशी फोनवर संवाद साधला होता. त्याची लॉ गार्डनजवळील मिटींग संपल्यानंतर तो घरी परतत होता, अशी त्याने स्वत: माहिती पत्नीला दिली होती. फोनवर दोघांची थट्टामस्करीही झाली होती. फोन केल्याच्या तासाभरानंतरही महेश घरी न परतल्याने हेतलने त्याचा नंबर पुन्हा डाएल केला. तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ असल्याचं समजलं. हेतलने त्याला सतत फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा नंबर स्वीच ऑफच येत होता.
हेतलला जेव्हा विमान दुर्घटनेविषयी समजलं, तेव्हा तिने लगेचच कार्तिकला फोन केला. पुढे गायकाच्या भावाने सांगितलं की, “महेशबाबत चिंताग्रस्त असतानाही मला वाटलं की यात काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. कारण जिथे ही घटना घडली होती, तिथून त्याचा जाण्याचा मार्गच नाही. पण पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर भावाच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हे त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलपासून 700 मीटर अंतरावर दाखवलं. पोलिसांनी सांगितलं की मोबाइलचा डेटा अचूक स्थान दाखवत नाही, त्यामुळे कदाचित तो दुर्घटनास्थळाच्या जवळही असावा”, असं कार्तिकने पुढे सांगितलं. तो नेहमीचा मार्ग नसतानाही महेश तिथून का गेला असावा, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना पडला आहे. त्यांनी जवळच्या सर्व रुग्णालयांमध्ये त्याच्याविषयी चौकशी केली. परंतु महेश अद्याप बेपत्ताच आहे.