"गाडगेबाबांबद्दल वाचलं की मला...", अभिनेता किरण मानेनी शेअर केली संत गाडगे महाराजांबद्दल खास पोस्ट
संत गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एक किर्तनकार आणि समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध होते. आज त्यांची पुण्यतिथी आहे. संत गाडगे महारांजांचं संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असं होतं. ते समाज प्रबोधन करण्यासाठी विविध गावांमध्ये भटकायचे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करायचे. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण गाडगेबाबा देत. गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे ते समाजसुधारक होते.
‘पॉवर पॅक आणि जबरदस्त असेल कथा’, मिर्झापूर चित्रपटाबाबत ‘गोलू’चा मोठा खुलासा!
आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठमोळा अभिनेता किरण मानेने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्यांचे विचार शेअर केले आहेत. संत गाडगे महाराज अभिनेता किरण मानेने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की,
“गाडगेबाबांबद्दल वाचलं की मला माझ्या आज्ज्याची, नानाची आठवण येते… माझा आज्जा, नाना वारकरी होता. अशिक्षित असुनबी तुकारामगाथा तोंडपाठ होती. तर, त्याच्या ट्रंकेत छोट्या-छोट्या डब्या, थैल्या असायच्या. आज्जा वर्षभर त्यात नाणी साठवून ठेवायचा. दहा पैसे, चार आणे, आठ आणे, रूपया.. आषाढीची पालखी निघंस्तोवर त्या गच्च भरायच्या. आज्जा रूबाबात वारीला निघायचा. बेभान होऊन ग्यानबा-तुकारामच्या गजरात नाचत-नाचत पंढरीला निघायचा…पंढरीला पोचल्यावर मात्र इठोबाच्या दर्शनाची लै आस नसायची त्याला. “
“पंढरीची माती कपाळाला लावून, कळसाचं दर्शन घिवून, समोर यिल त्या वारकर्याच्या पाया पडत थेट चंद्रभागेच्या वाळवंटात पोचायचा. तिथं गोरगरीब, भुकेले भिकारी, महारोगी बसलेले असायचे तिथं जायचा आणि त्याच्या डबीतला आन् थैल्यांमधला सगळा खजिना हळूहळू वाटायला सुरूवात करायचा…काहीजणांना खायला घेऊन द्यायचा.. सगळे तृप्त होऊन हसले की गडी खुश ! म्हणायचा, “चलंय दिनकर, किरन्या चल, झाली वारी.” आम्ही म्हणायचो, “दर्शन?” म्हणायचा, “या घिवून. जा.” आन् तिथंच त्या गोरगरीबांच्यात सावली बघून धोतर तोंडावर घेऊन सुखात झोपी जायचा ! गाडगेबाबांशी नाळ जोडणारं हाय का नाय ह्ये भावांनो? जवानीत आज्ज्यानं गाडगेबाबांची किर्तनं ऐकली होती… त्याचा प्रभाव जाणवायचा प्रत्येक कृतीत… गाडगेबाबा म्हणायचे,”संत तुकाराम माझा गुरू. माझा कुनी शिष्य नाय.” हेच विचार अंगीकारलेवते माझ्या आज्ज्यानं.”
“कधी कुणाकडून पाया पडून घेत नसे माझा आज्जा ! गाडगेबाबांसारखाच. अडाणी असून माझ्या आज्ज्यानं घरात कधीच अंधश्रद्धेला थारा दिला नाय.. दारात आलेल्या याचकाला भुकेल्यापोटी परत पाठवलं नाय.. गाडगेबाबा म्हणायचे की, “शिक्षण ही लै मोठी गोष्ट हाय. जर तुमच्याकडं पैसं नसत्याल तर घरातली भांडी इका.. बायकापोरांसाठी स्वस्तातली कापडं खरेदी करा.. मोडक्या तोडक्या घरात र्हा, पण पोरापोरींना शिक्षन दिल्याशिवाय राहू नका.” माझ्या आज्ज्यानं हेच केलं ! लोकांकडं मजूरी केली. विहीरी खणल्या. मुंबैत जाऊन हमाली केली. लै गरीबीत दिस काढलं. पण एका पोराला-माझ्या बापाला इंजिनीयर केलं… दुसर्या पोराला-माझ्या चुलत्याला शिक्षक बनवलं. उरलेले दोघं शेतीत रमले. अप्रत्यक्षरीत्या का होईना, पण गाडगेबाबांचे संस्कार आज्ज्यानं आमच्यात रूजवले ! …कुठल्याबी गांवात गेल्यावर दिवसा गावातली घाण खराट्यानं स्वच्छ करायची आणि रात्री त्याच गावातल्या अडाणी बहुजनांच्या लोकांच्या डोक्यातली वाईट विचारांची घाण किर्तनानं दूर करायची, हे व्रत घेतलेल्या..विचारांनी अनेक पिढ्यांचं कल्याण करनार्या संत गाडगेबाबांना कोटी कोटी प्रणाम.”