फोटो सौैजन्य: स्टार प्रवाह
स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आता पुन्हा नवं वळण पाहायला मिळत आहे. रणदिवे कुटुंब आणि विशेषत: जानकी या सगळयांना आजवर ऐश्वर्यामुळे खूप काही सहन करावं लागलं आहे. रणदिवेंच्या प्रॉपर्टीसाठी आणि जानकीवर सूड घेण्यासाठी ऐश्वर्या अनेक कटकारस्थानं करते मात्र यासगळ्यात ती स्वत:च फसते. सारंगचं सत्य बाहेर आल्यावर आता मात्र चौताळलेल्या ऐश्वर्याने तिच्या वडिलांना जामिनावर सोडवून बाहेर आणलं. जानकीला त्रास देण्यासाठी ऐश्वर्याने तिच्या आईला देखील त्रास देण्यास कमी केली नाही. रणदिवेंच्या प्रॉपर्टीसाठी कुठल्याही थराला जाणारी ऐश्वर्या आता पुन्हा एकदा स्वत:च्या जाळ्यात अडकली आहे.
मास्कमॅनच्या मदतीने रणदिवेंच्या प्रॉपर्टीसाठी केलेल्या प्लॅनमध्ये ऐश्वर्याचा डाव तिच्यावर उधळताना दिसत आहे. सोमवारी आणि मंगळवारच्या भागात मालिकेत मोठा ट्विस्ट घडणार आहे. काही दिवस आधी मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. मालिकेच्या प्रोमोनुसार, मास्कमॅनला ऐश्वर्या असं म्हणते माझ्याविरोधातील पुरावे मी तुम्हाला दिलेत आता मला 50 कोटी रुपये पाहिजेत. मास्कमॅन तिला 50 कोटींची बॅग देतो. त्यानंतर जानकीच्या बोलण्याचा आवाज येतो, जानकी म्हणते दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ऐश्वर्या. तेव्हा कळतं की, मास्कमॅन नसून ती जानकी आहे.
खरंतर कोर्टात ऐश्वर्याच्या विरोधात पुरावे सादर होणार या भितीने ऐश्वर्या सौमित्रची बायको अवंतिकाला किडनॅप करते. अवंतिकाचा जीव धोक्यात असल्य़ाने न राहून सौमित्र सगळे पुरावे ऐश्वर्याला आणून देतो. पुरावे ऐश्वर्याला दिलेत हे कळताच ऋषिकेशच्या रागाचा पारा चढतो आणि सौमित्रला जाब विचारतो. त्यावेळी जानकीमध्ये पडते आणि ऋषिकेशला समजावते. जर सौमित्रने पुरावे दिले नसते तर अवंतिकाच्या जीवाला धोका होता. त्यावर ऋषिकेश विचारतो की आता पुरावे मिळवायचे कसे? त्यावर जानकी म्हणते की आता काट्याने काटा काढण्याची गरज आहे. आता मास्कमॅनच आपल्याला पुरावे मिळवायला मदत करेन.
जानकी मास्कमॅन बनून ऐश्वर्याला भेटते आणि पुरावे तिच्याकडून मिळवते. हा भाग उद्या म्हणजेच 6 ते 8 ऑक्टोबरमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ऐश्वर्याला खरच शिक्षा होणार का? जानकीची आई सापडणार का? जानकीवर असलेले आरोप खोटे असल्याचं समोर येईल का ? आणि या मास्कमॅनचं सत्य सगळ्यांसमोर येणार का ? याकडे आता प्रेक्षकांची उत्सुकता लागलेली आहे.