Amruta Khanvilkar (फोटो सौजन्य -Instagram)
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या काही दिवसांपूर्वी आईची एक शस्त्रिक्रिया पूर्ण झाली स्वामींच्या आणि देवाच्या कृपेने ती अगदी नीट पार देखील पडली या बद्दल अमृताने एक पोस्ट सोशल मीडिया वर शेअर करून तिने डॉक्टरांचे सगळ्या मित्रमैत्रिणी आणि देवाचे आभार मानले आहे. अमृताने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्वामींचा एक फोटो आणि कुटुंबासोबाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अमृताने स्वामींचे मानले आभार
अमृताने ही पोस्ट शेअर करताना एक सुंदर नोट देखील लिहिली आहे, त्यामध्ये तिने लिहिले की, “गुरू म्हणजे पाठीशी उभा राहणारा, गुरू म्हणजे वाट दाखवणारा, आपल्या वर येणारं संकट झेलण्याची ताकत देणारा आणि काहीच न मागता आपल्याला देणारा म्हणजे गुरू… गेले दोन महिने माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी प्रचंड अवघड होते. माझ्या आईची ५ तारखेला ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. तिला कुठल्याही प्रकारचा अटॅक किंवा कसलाही जीवघेणा त्रास झाला नाही. ‘मम्माची कंडिशन आम्हाला डिटेक्ट करता आली आणि त्यावर योग्य ते उपचार करता आले, ह्यात फक्त आणि फक्त स्वामींची कृपा होती.’ असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
अमृताने या पोस्टमधून तिच्या आईची शस्त्रक्रिया जिथे पार पडली त्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूट या संस्थेचे आणि ज्यांनी शस्त्रक्रिया केली ते पद्मश्री डॉ. रमाकांत पांडा यांचे आभार मानले. डॉक्टरांना उद्देशून ती म्हणाली की, ‘तुम्हाला देवानेच पाठवले आहे’. या पोस्टमध्ये डिसिल्वा सर, वंजारे सर, ICU आणि जनरल वॉर्डमधील नर्स, डॉ रोशन आणि तिथल्या संपूर्ण स्टाफचे तिने आभार मानले. आणि पुढे ती म्हणाली, “जीवनाला हादरवून टाकणाऱ्या अशा अचानक घडलेल्या घटनांमध्ये आपल्याला विश्वास सापडतो आणि माझेही असेच झाले आहे. मी माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबाचे आभार मानू इच्छिते ज्यांनी सावलीप्रमाणे माझी साथ दिली, मला मिठी मारली, मला समजून घेतले आणि मला सांभाळले… तुम्ही माझे देवदूत आहात आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे की, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.’आई आता बरी होत आहे आणि प्रत्येक स्त्री आयर्न लेडी आहे हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले. श्री स्वामी समर्थ. मम्मा माझे तुझ्यावर प्रेम आहे” असे या पोस्टमध्ये लिहून ती भावुक झाली.
अमृताने दिला चाहत्यांना मोलाचा सल्ला
इथेच न थांबता प्रेक्षकांना एक मोलाचा आणि महत्त्वपूर्ण सल्ला देताना ती म्हणते “शेवटी सर्वांना मी असे आवाहन करते की, ‘ही घटना घडल्यानंतर सर्व मुलं आणि पालकांना सांगू इच्छिते की, कृपया तुमच्या कुटुंबातील कोणालाही किंवा त्यांच्या आरोग्याला गृहीत धरू नका, ३ वर्षांपूर्वी मी माझ्या अशाच एका महत्त्वाच्या व्यक्तीला गमावले आहे. माझ्या आईला कधी अर्धा दिवसही रुग्णालयात दाखल करायची वेळ आली नव्हती, तिला आतापर्यंत कोणतीही आरोग्य समस्या आली नाही आहे. परंतु आता तिची एवढी मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे कृपया नियमित तपासणी करून घ्या, कृपया आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो”. असे तिने या नोट मधून चाहत्यांना आणि प्रेक्षकांना सांगितले.
अमृता आणि तिच्या आईचं नात हे सगळ्यांना माहीत आहे अनेक मुलाखती असो किंवा इव्हेंट अमृताची आई तिच्या सोबत कायम खंबीरपणे पाठीशी असते. अभिनेत्री म्हणून अमृताची एक बाजू सगळ्यांनी पाहिली आहे पण एक मुलगी म्हणून आई बद्दलची माया प्रेम हे या सगळ्यातून स्पष्ट पाहायला मिळाली आहे.