(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अशोक सराफ आणि निवेदिता या दोघांनीही हसऱ्या केमिस्ट्रीपासून ते भावनिक प्रसंगांपर्यंत, या जोडीने प्रत्येक वेळेस हृदयाला भिडणारे क्षण दिले आहेत. आता त्यांचं हे सुंदर नातं पुन्हा एकदा ‘अशोक मा.मा.’ या मालिकेमधून छोट्या पडद्यावर खुलणार आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिकेचा भाग होताना दिसणार आहे. आता त्यांच्या एन्ट्रीने नक्की मालिकेत काय घडणार? अशोक मा.मा. आणि निवेदिता यांच्यामधील नातं कसं खुलणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशोक मा.मा. मालिकेतून संपूर्ण टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एकाच मालिकेत एकत्र येणार आहेत.
या मालिकेत निवेदिता ताई निवेदिता हि भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर, त्या उत्साही, आत्मनिर्भर आणि अविवाहित स्त्रीची भूमिका करणार आहेत. त्या स्वतःचा ‘संस्कार वर्ग’ चालवतात. पण त्यांचा संस्कार वर्ग हा पारंपरिक चौकटीत बसलेला नाही. तो आहे दया,आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेने भरलेला. त्या मुलांना कथा, कला आणि हास्याच्या माध्यमातून जीवनमूल्यं शिकवताना दिसणार आहेत. जेव्हा अशोक मा.मा. आपल्या नातवंडांना इरा आणि इशानला या वर्गात आणतात, तेव्हा त्यांना अपेक्षा असते एका शिस्तप्रिय, पारंपरिक शिक्षिकेची. पण समोर येते एक वेगळीच स्त्री आधुनिक विचारांची, पण मुळाशी असलेली. तिची मोकळी, हटके शिकवण्याची पद्धत मामांचे ठाम विचार हादरवून टाकते… आता हळूहळू दोघांमधील चकमकीतून यांचं नातं कोणतं वळण घेणार ? हे मालिकेतच दिसणार आहे.
निवेदिता सराफ याबद्दल म्हणाल्या, “मला खूप दिवसांपासून प्रेक्षक विचारात होते तुम्ही आणि अशोक सराफ एकत्र कधी काम करणार आहात. तर बऱ्याच दिवसांपासून माझी देखील इच्छा होती त्यांच्यासोबत काम करायची. मला खरंच खूप आवडतं त्यांच्याबरोबर काम करायला, माझे सर्वात आनंदाचे दिवस असतात जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करते. खूपकाही शिकायला मिळतं. बऱ्याच वर्षांनी मला ही संधी मिळाली आहे, आता लवकरच अशोक मा.मा. या मालिकेत माझी एन्ट्री होणार आहे. यामधील खास गोष्ट म्हणजे छोट्या पडद्यावर आमची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. मी खूप उत्सुक आहे, खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल.”






