(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे. आणि हा चित्रपट म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’ असणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यातून अनेक रहस्य आणि विनोद प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘ संजय कपूर यांचे अंत्यसंस्कार कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
‘गाडी नंबर १७६०’ या आगामी चित्रपटाच्या शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, प्रत्येकजण पैशांनी भरलेल्या एका काळ्या बॅगेच्या मागे लागलेला आहे. ही बॅग कुणाची आहे? या बॅगमध्ये काय दडले आहे? आणि ‘गाडी नंबर १७६०’ चा या सगळ्याशी काय संबंध आहे? हे सगळं एक अनोखं रहस्य आहे, जे ४ जुलैला चित्रपटगृहात उलगडणार आहे. दरम्यान चित्रपटातील वातावरण मजेदार असले तरी त्यामागे एक खोल आणि विचार करायला लावणारा संदेश चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच, एक मोठं रहस्य शेवटपर्यंत उलगडत जाणार आहे आणि ही या चित्रपटाची खासियत ठरणार आहे.
या चित्रपटाबद्दल सांगताना दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड म्हणाले की, “हा चित्रपट म्हणजे केवळ एक रहस्यमयी कथा नाही, तर मानवी लालसेचा आणि गोंधळलेल्या नैतिकतेचा एक आरसा आहे. प्रत्येक पात्र बॅगेच्या मागे का लागले आहे, यामागील कारणे वेगवेगळी असली तरी त्यांची उद्दिष्ट मात्र एकसारखीच आहेत ती म्हणजे पैसा. प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्यासाठी आम्ही कथानकाला थोडे हटके वळण दिले आहे. या प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आहे.”
‘Meesho ची दीपिका…’, अनन्याचा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांचा संताप; कार्तिक आर्यनलाही केले ट्रोल
तसेच पुढे निर्माते कैलाश सोराडी म्हणाले की, ”तन्वी फिल्म्सच्या वतीने आम्ही प्रेक्षकांसमोर नेहमीच दर्जेदार आणि हटके कथा घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ‘गाडी नंबर १७६०’ हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच एक सशक्त कथा घेऊन आला आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करून त्यांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्याची ताकद या चित्रपटात आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.”
तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन योगीराज संजय गायकवाड यांनी केले आहे. चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारखे दमदार कलाकार काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या ४ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.