अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. प्रियाला जाऊन काही दिवस झालेत मात्र अजूनही ती या जगात नाही हे मान्य होत नाही अशा कितीतरी प्रतिक्रिया सहकलाकारांनी दिल्या होत्या. मात्र आता तिचा पती अभिनेता शंतनू मोघे याने नुकतंच पुन्हा मालिकेत काम करायला सुरुवात केली आहे. प्रियाच्या जाण्यानंतर पहिल्यांदा शंतनूने प्रतिक्रिया दिलेली आहे.
स्टार प्रवाहवरील याड लागलं प्रेमाचं या मालिकेत काही दिवसांपुर्वीच शंतनूची एन्ट्री झाली होती. मात्र प्रियाच्या आजारपणात त्याला शुटींग आणि तिला वेळ देणं शक्य होत नव्हतं. मात्र प्रियाच्या निधनानंतर काही दिवसांचा ब्रेक घेतलेला शंतनू आता पुन्हा एकदा मालिकेत काम करण्य़ास सज्ज झाला आहे. शंतनू पुन्हा एकदा कामावर रुजू झाला असून त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“मध्यंतरीच्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं आवश्यक होतं, म्हणून कोणत्याच कलाकृतीत दिसलो नाही. आयुष्यात आलेलं ते वळण पार केल्यानंतर पुन्हा कामाला लागलो आहे. कारण माझे वडील म्हणजेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे मला नेहमी सांगायचे, आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात काहीही कमी पडू द्यायचं नाही. व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं. वैयक्तिक सुख-दुःख खुंटीला टांगून त्या-त्या व्यक्तिरेखेची सुख-दुःख आपलीशी करणं हा कलाकाराचा धर्म असतो…”
“कोणत्याही परिस्थितीत कलाकृतीशी असलेली कमिटमेंट पाळायची हा कलाकारानं स्वतःशी केलेला अलिखित करार असतो. काम करत राहणं हीच प्रियाला श्रद्धांजली आहे. आजवर प्रिया आणि माझ्यावर मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, हीच आमची खरी ताकद आहे…”, असंही शंतनू म्हणाला.
या सगळ्याबरोबरच शंतनुने मालिकेतील त्याच्या भूमिकेबाबत देखील सांगितलं आहे. शंतनू म्हणाला की, मालिकेतील माझी भूमिका अनेकांना नकारात्मक भूमिका असल्याचं देखील वाटतं. खरंतर मी खलनायक साकारत नसून या भूमिकेचे अनेक विविध पैलू आहेत. कधी चिडखोर तर कधी हळवा, कधी शांत तर कधी रागीट अशी ही भूमिका आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मालिका जस जशी पुढे जाईल तशीच ही भूमिका देखील आवडायला लागेल, असंही त्याने सांगितलं आहे. मालिकेत शंतनूने पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलं आहे त्याबद्दल सांगताना शंतनू म्हणाला की, स्टार प्रवाह वाहिनी आणि सतीश राजवाडे यांनी मला मधल्या काळात खूप सांभाळून घेतलं आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात करणार असल्याचं शंतनू म्हणाला.