(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दत्तजयंतीच्या मुहूर्तावर कलर्स मराठी वाहिनीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत खास भागांचे आयोजन करण्यात आले आहे. ही मालिका चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रतिसाद आणि प्रेम मिळत आहे. ‘जय जय स्वामी समर्थ ‘ या मालिकेमध्ये अभिनेता अक्षय मुडावदकर यांनी स्वामींची मुख्य भूमिका साकारली आहे. आज त्यांनी दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घेतले आहे.
दत्तजयंतीच्या मुहूर्तावर कलर्स मराठी प्रेक्षकांसाठी एक भव्यदिव्य, भावपूर्ण आध्यात्मिक कथा दत्तजयंती विशेष सप्ताहाच्या स्वरूपात घेऊन आली आहे. याच दत्त जयंती विशेष भागाच्या निमित्ताने मालिकेतील प्रमुख कलाकार अक्षय मुडावदकर यांनी अक्कलकोटला भेट देत स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. मालिकेचे हे सगळे भाग ४ ते १० डिसेंबरला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या विशेष भागात स्वामी समर्थांच्या दत्त अवताराचं रहस्य, त्यांच्या भक्त कृपा, लीला आणि ब्रह्मा–विष्णू–महेश या त्रिदेवांच्या शक्तींचा एकत्रित अनुभव साकार करतील. दत्त म्हणजे उत्पत्ती, पालन आणि संहार यांचा परम संगम आणि या तीन शक्तींचं दिव्य प्रगटीकरण प्रेक्षकांना प्रथमच एका सलग कथेत आठवडाभर विस्ताराने अनुभवायला मिळणार आहे.
या विशेष अनुभवाबद्दल बोलताना अक्षय मुडावदकर म्हणाले, “स्वामींचं दर्शन घेतल्यावर मनात अपरंपार समाधान आणि ऊर्जा मिळते. प्रेक्षकांकडून आणि स्वामी भक्तांकडून आतापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवला की त्यांच्या कृपेचा स्पर्श नक्कीच लाभतो. आज माझ्या हस्ते प्रसाद वितरण झालं, वातावरण संपूर्ण भक्तिमय झालेचे दिसले. योग्य दिवशी हा योग आला आणि मी अक्षरशः भावनेने भारावून गेलो. स्वामी समर्थ महाराजांचं सदैव ऋणी आहे, यंदा स्वामी समर्थांच्या दत्त अवताराचं रहस्य आम्ही मालिकेत उलगडणार आहोत, त्या पार्श्वभूमीवर हा योग जुळून येणे अलौकिक गोष्ट आहे.” असे अभिनेत्याने म्हटले.
मालिकेची ही विशेष कथा रंजना नावाच्या एका तरुणीच्या संघर्षमय आयुष्याभोवती फिरते, जिथे काका-काकूंचा छळ, भावाचा जीवघेणा आजार आणि गावगुंड अभिरामच्या अत्याचारामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं दिसतं. आजच्या काळाचे प्रतिबिंब असलेल्या रंजनाच्या असहाय हाकेला स्वामी कसे उत्तर देतात आणि प्रत्यक्ष स्वामी समर्थ तीन रूपांत कसे प्रकट होतात? हे सगळं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
स्वामींचे ब्रह्मरूप प्रजापती, विष्णूरूप नारायण आणि रुद्ररूप महेश या रूपात वेगवेगळे येण्याचे त्यांचे प्रयोजन काय? उत्पत्ती, पालन आणि संहार तत्त्वाच्या या तिन्ही दैवी शक्ती एकत्र आल्यानंतर घडणारा चमत्कार नेमका काय असेल याची उत्तरे या दत्तजयंती विशेष सप्ताहात मिळणार आहेत. अध्यात्म, भक्ती, चमत्कार आणि मानवी भावनांचा सुंदर संगम असलेले हे विशेष भाग प्रेक्षकांना श्री गुरुदेव दत्ताच्या कृपेची दिव्य अनुभूती देतील. तेव्हा ‘जय जय स्वामी समर्थ दत्तजयंती विशेष’, ४ ते १० डिसेंबरला प्रेक्षकांनी नक्की पाहावा.






