(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी टेलिव्हिजन विश्वात आणखी एक हळवी आणि भावनिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सन मराठी वाहिनीवर मी संसार माझा रेखिते ही मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहे.
या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री दिप्ती केतकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दिप्तीने यापूर्वी ‘रंग माझा वेगळा’, ‘लगीन घाईचं’, ‘अभ्यासू’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्यासोबत अभिनेता हरीश दुधाडे झळकणार आहे, जो ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘तुझेच मी गीत गातो’मधील भूमिकांमुळे प्रेक्षकांना परिचित आहे.
‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.”जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं…” अशी या मालिकेची टॅगलाइन आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ही कथा एका नात्याचा, संसाराचा आणि दोन व्यक्तींमधील भावनिक बंधाचा प्रवास दाखवणार आहे.
मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रोमोमध्ये दिप्ती एका समर्पित, मेहनती आणि कुटुंबासाठी जगणाऱ्या स्त्रीच्या भूमिकेत दिसते. तिच्या चेहऱ्यावरची शांतता आणि नजरेत दडलेली वेदना प्रेक्षकांच्या मनाला भिडते. संसाराच्या गाड्यात ओढली गेलेली ही स्त्री आपल्या भावना, स्वप्नं आणि स्वतःची ओळख विसरत चालली आहेआणि हाच तिच्या प्रवासाचा केंद्रबिंदू ठरतो.
“जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं.” नवी मालिका ‘मी संसार माझा रेखिते’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका १ डिसेंबरपासून दररोज रात्री ९:३० वाजता प्रसारित होणार असून, आधुनिक स्त्रीच्या आयुष्यातील संघर्ष, आत्मविश्वास आणि प्रेमाच्या शोधाचा प्रवास मांडणार आहे.






