(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
लग्नासाठी स्थळ पाहायला जाण्याची लगबग, धावपळ, काळजी व्यक्त करणारं “पाहुणे येत आहेत पोरी…” हे स्थळ चित्रपटातील गाणं नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. चित्रपटाच्या टीजरला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अत्यंत श्रवणीय गाणं दाद मिळवत असून, “स्थळ” हा चित्रपट महिला दिनानिमित्त ७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित झाला होता. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा यांनी स्थळ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जयंत दिगंबर सोमलकर यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. ॲरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट “स्थळ” या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने ७ मार्च रोजी ‘स्थळ’ हा चित्रपट संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
“पाहुणे येत आहेत पोरी…” हे गाणं मीराबाई येते आणि आशिष नारखेडकर यांनी गायलं आहे. जयंत सोमलकर यांच्या शब्दांना माधव अगरवाल यांनी स्वरसाज चढवला आहे. हार्मोनियमवरची सूरावट आणि नेमका ठेका यांनी गाण्यातल्या शब्दांना आणखी रंजक केले आहे. चित्रपटात पारंपरिकपणे गायिकांकडून गाणी गाऊन घेतली जातात. मात्र “स्थळ” चित्रपटातलं हे गाणं गाण्याची आवड असलेल्या, पण व्यावसायिक नसलेल्या मीराबाई या चंद्रपूरनजीकच्या महिलेने गायलं आहे. हे गाणं आता सोशल मीडियावर गाजत आहे. प्रेक्षकांच्या नक्कीच ते पसंतीस पडणार आहे.
मल्टीस्टारर “देवमाणूस” चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज, चित्रपटामध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी
नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. प्रतिष्ठेच्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह तब्बल २९ महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे, तसेच १६ पेक्षा जास्त पुरस्कारही या चित्रपटाने पटकावले आहेत. हा चित्रपट लवकरच येत्या ७ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ज्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.