(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाह नव्या वर्षात मनोरंजनाचा महाधमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. वचन दिले तू मला, मी सावित्रीबाई जोतीराव फुले आणि मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४ या कार्यक्रमांसोबतच आणखी एक नवी मालिका स्टार प्रवाहच्या परिवारात दाखल होतेय. या नव्या मालिकेचं नाव आहे तुझ्या सोबतीने. एकीकडे मुंबईतल्या चाळीत राहणारी, कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलणारी आणि तरीही आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहाणारी नुपूर. तिच्या मते सगळेच परिपूर्ण नसतात. जग इमपरफेक्शनच्या तत्वांवर चालतं. तर दुसरीकडे ग्लॅमर, लाईट्स आणि परफेक्शनच्या जगातला सुमती इव्हेंट्सचा मालक मल्हार खानविलकर. नुपूर आणि मल्हारचं जग जरी वेगळं असलं एकमेकांच्या साथीने ते प्रवास कसा करतात याची गोष्ट म्हणजे तुझ्या सोबतीने ही मालिका. एतशा संझगिरी आणि अजिंक्य ननावरे ही नवी जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नव्या वर्षातल्या या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपली नोकरी सांभाळून आपलं घर सुद्धा सांभाळणाऱ्या अनेक स्त्रिया आपल्या अवतीभवती दिसतात. त्या कदाचित या गोष्टीचा कधी बाऊ करणार नाहीत पण त्या सुपर वुमन असतात यात कोणताच वाद नाही. ही मालिका नुपूर नावाच्या अश्याच एका मुलीची आहे. तिला भेटणारा मल्हार तिच्या या विश्वासाला आणि जिद्दीला पुरक असा सोबती आहे. एकमेकांच्या सोबतीने ते एकमेकांना कसे पुरक ठरतात आणि नियतीने या दोघांचे मार्ग कसे आधीच जोडून ठेवले असतात हे पहाणं फार रंजक ठरेल.’
छोटी मालकीण या मालिकेनंतर जवळपास सात वर्षांनी एतशा पुन्हा स्टार प्रवाहवर दिसणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली की, या मालिकेची कथा खूप सुंदर आहे आणि पात्रंही अगदी घरातील वाटावीत अशी आहेत.या मालिकेत एतशा नुपूरची भूमिका करतेय. नुपूरने लहानपणापासूनच घरची जबाबदारी सांभाळली, पण कधीही तिने त्याचा मोठेपणा केला नाही. नुपूरला स्वयंपाकाची खास हातोटी आहे. साध्या-साध्या वस्तूंपासूनही ती चविष्ट पदार्थ बनवू शकते. तिच्या मते पदार्थाची फक्त चव नव्हे, तर त्याचा सुगंध आणि दिसणंदेखील तेवढंच महत्त्वाचं असतं.
Dhurandhar चा होणार खेळ खल्लास! Avatar 3 देणार टक्कर; ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहून व्हाल चकीत
अभिनेता अजिंक्य ननावरे देखिल जवळपास १० वर्षांनंतर स्टार प्रवाहसोबत काम करणार आहे. या मालिकेतली मल्हार ही भूमिका साकारण्यासाठी तो फारच उत्सुक आहे. स्टार प्रवाहसोबत जुनं नातं आहे. तू जीवाला गुंतवावे मालिकेच्या निमित्ताने मालिका विश्वात झळकण्याची पहिली संधी स्टार प्रवाहने दिली होती. पुन्हा एकदा या कुटुंबात येताना अत्यानंद होतोय. नव्या वर्षाची सुरुवात नव्या प्रोजेक्टने होणार आहे. मल्हार लहानपणापासूनच अत्यंत हुशार. घरात नेहमीच त्याचं कौतुक झालंय. आई लहानपणीच देवाघरी गेल्यामुळे त्याची चुलत बहीण तायडी त्याचा आधार बनली. मल्हारचं आपल्या कुटुंबावर विशेष करुन तायडीवर प्रचंड प्रेम आहे. तायडी त्याच्यासाठी आईसमान आहे. तो तिच्यासाठी आपला जीवही धोक्यात घालू शकतो. मल्हारला परफेक्शनचं वेड आहे. तो भावनांमध्ये अडकून पडत नाही. गरजवंतांची मदत करतो मात्र कुणालाही कळू न देता. त्याचा प्रेमावर आणि लग्नावर अजिबात विश्वास नाही. अतिशय वेगळं पात्र आहे त्यामुळे साकारताना मजा येणार आहे अशी भावना अजिंक्यने व्यक्त केली.’






