(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सध्या चित्रपटगृहात नवनवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. याचदरम्यान आणखी एका मराठी चित्रपटाची भर यामध्ये पडली आहे. आणि तो चित्रपट म्हणजे ‘मना’चे श्लोक’. ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटामध्ये नवी प्रेम कहाणी खुलताना प्रेक्षकांना दिसणार आहे. तसेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि अभिनेता राहुल पेठे यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तसेच या चित्रपटात मृण्मयी मनवा आणि राहुल श्लोकची भूमिका साकारणार आहे.
‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मनवा आणि श्लोकच्या जोडीलाही प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या धमाल टीझरनंतर आता प्रेक्षक चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. याच उत्सुकतेत भर घालत चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘तू बोल ना’ या गाण्यात मनवा आणि श्लोक यांच्या नात्यात फुलणारं प्रेम पाहायला मिळत आहे. त्या दोघांचे गोड क्षण या गाण्यात दिसत आहेत. या सुंदर गाण्याला तुषार जोशी यांचा मधुर आवाज लाभला असून गौतमी देशपांडेने या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर सिद्धार्थ आणि सौमिल यांच्या सुरेल संगीताने हे गाणं अधिकच जबरदस्त बनले आहे.
करिश्मा कपूरच्या मुलांना नाही मिळाले त्यांच्या हक्काचे १९०० कोटी रुपये; सावत्र आईने केला विश्वासघात?
या गाण्याचे चित्रीकरण हिमालयात झाल्याने त्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. यात मनवा आणि श्लोकची केमिस्ट्री पाहायला मिळत असून या दोघांचे पुढे काय होणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी अभिनेत्री आणि आता दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे करत आहे. मृण्मयी पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.
या चित्रपटाबद्दल आणि दिग्दर्शनाच्या अनुभवाबद्दल सांगताना, दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणाली की, ”या चित्रपटातील हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. हिमालयात हे गाणं चित्रित केल्यानं हे दिसतानाही सुंदर दिसतेय आणि त्या गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभवही अत्यंत सुंदर होता आणि प्रेक्षकांना हे नक्कीच आवडेल.” आता या चित्रपटाला आणि चित्रपटामधील गाण्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
शाहरुख, सलमान, आमिर, बादशाह, रणवीर सिंग आणि अनेक स्टार्स एकाच सीरिजमध्ये! कधी, कुठे बघाल ?
‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तसेच या चित्रपटामधील मृण्मयी आणि राहुल पेठे या दोघांची नवी जोडी पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.