‘बॅटल ऑफ गलवान’च्या टीझरनंतर आता निर्मात्यांनी चित्रपटातील पहिले गाणे ‘मातृभूमी’ रिलीज केले आहे. हे गाणं सिनेमाच्या म्युझिकल प्रवासाची पहिली झलक असून , त्यात देशभक्ती आणि भावना यांचा सुंदर मिलाफ दिसतो. साधे पण प्रभावी असे हे गाणे चित्रपटाचा मूड सेट करत असून, रिलीजपूर्वी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवते. या गाण्याचा रिल सलमान खानने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या गाण्यात सलमान खान भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत, तर त्यांच्या सोबत चित्रांगदा सिंग झळकली . दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अतिशय नैसर्गिक आणि भावनिक वाटते. दोन लहान मुलांसह कुटुंब म्हणून दाखवण्यात आले आहे, जिथे घरातील शांत, प्रेमळ क्षण आणि गलवानमधील कठोर युद्धदृश्ये एकाच वेळी पाहायला मिळतात. ‘मातृभूमी’ गात असताना दाखवलेले कुटुंबीय क्षण कर्तव्य आणि संघर्षाच्या प्रसंगांशी जोडले गेले आहेत, ज्यातून प्रेम, त्याग आणि देशसेवेची भावना अधिक खोलवर पोहोचते.
’भावनिक आणि देशभक्तीने भारावून टाकणाऱ्या या गाण्याचं संगीत हिमेश रश्मियाने केलं आहे. हिमेशने सांगितले की ‘बॅटल ऑफ गलवान’साठी ‘मातृभूमी’ गाणं तयार करणं हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत भावनिक अनुभव होता. अरिजीत सिंग आणि श्रेया घोषाल यांच्याबरोबर काम करणं कायमच आनंद देणारं असतं जे यावेळी देखील झालं. सलमान खानसोबत पुन्हा एकदा जोडलं जाणं आणि सलमान खान फिल्म्सच्या म्युझिक लेबलखाली गाण्याचा रिलीज होणं हा संपूर्ण प्रवास अधिक खास बनवतो, असंही हिमेशने सांगितलं.‘मातृभूमी’चे गाणं गीतकार समीर अंजन यांनी शब्दबद्ध केलं तर अरिजीत सिंग आणि श्रेया घोषाल यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गाणे गायले आहे.
‘बॅटल ऑफ गलवान’ची निर्मिती सलमा खान यांनी सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे, तर चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले आहे. चित्रपटाचे संगीत सलमान खान फिल्म्स म्युझिक लेबलकडून रिलीज झाले असून, सोनी म्युझिक इंडिया ही त्याची अधिकृत म्युझिक डिस्ट्रीब्युशन पार्टनर आहे. शौर्य, बलिदान आणि जिद्दीची कथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्याचे वचन देतो, ज्यामध्ये चित्रांगदा सिंह देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.






