फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदाच अभिनेत्याने एका पॉडकास्ट चॅनलला मुलाखत दिली आहे. त्या पॉडकास्ट चॅनलचे नाव ‘डंब बिर्याणी’ असं असून ते त्याच्या पुतण्याचे स्वत:चे चॅनल आहे. या पॉडकास्टमध्ये सलमानने वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. शिवाय, त्याने सध्याच्या तरुण पिढीलाही काही महत्त्वाचे सल्ले दिले. मुलाखतीत अभिनेत्याने विमान प्रवासातला एक किस्साही सांगितला. जो ऐकून तुम्ही नक्कीच हसून लोटपोट तर व्हालंच, पण भाईजानवर आलेल्या धोक्यामुळे तुम्हाला त्याची काळजीही वाटेल.
पॉडकास्टमध्ये सलमान खानने मृत्यू जवळून पाहिल्याचे म्हणत संपूर्ण घटना सांगितली. मुलाखतीदरम्यान सलमान खानने अरबाजचा मुलगा अरहान आणि त्याच्या मित्रांना, दोन्हीही कानात हेडफोन लावू नये, असा मोलाचा सल्ला दिला आहे. कारण की, दोन्हीही कानात हेडफोन घातल्यामुळे आपल्या आजुबाजुला काय घडतंय, याबद्दल आपल्याला काहीही कळत नाही. सध्याचा तरुणवर्ग कृपया नेहमीच एकाच कानात हेडफोन घाला, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काय चालले आहे ते कळेल. याविषयालाच अनुसरुन सलमानने श्रीलंकेहून परतत असतानाचा किस्सा सांगितला.
श्रीलंकेतून परतत असताना काय घडले होते, याबद्दलचा किस्सा सांगताना सलमान खानने सांगितले की, “आयफा पुरस्कार सोहळा आटोपल्यानंतर आम्ही श्रीलंकेतून विमानातून परत येत होतो. सगळे जण हसत होते, गप्पा चालू होत्या. अचानक विमानाच्या इंजिनाचा आवाज येऊ लागला. तो आवाज काही क्षणांसाठी नव्हता तर ४५ मिनिटे विमानाच्या इंजिनाचा आवाज येत होता. जवळजवळ सगळेच प्रवासी त्या आवाजाला घाबरले होते. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर भीती दिसत होती. त्यावेळी माझ्यासोबत सोहेलही होता. मी सोहेलकडे पाहिले, तर तो शांतपणे झोपला होता. जेव्हा अशी काही गंभीर परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण एअर होस्टेसकडे आशेनं पाहतो.”
“लग्न, घटस्फोट, चिंता अन्…”, असं काय म्हणाली करीना कपूर, बेबोची क्रिप्टिक पोस्ट हैराण करणारी
“मात्र, मी एअर होस्टेसकडे पाहिलं, तर तीसुद्धा घाबरलेली दिसत होती. प्रार्थना करीत होती. पायलटसुद्धा काळजीत पडला होता की हे नेमकं काय चाललं आहे. ऑक्सिजन मास्क खाली पडत होते.” सलमानने पुढे सांगितले की, “मी हे दृश्य फक्त चित्रपटातच पाहिलं होतं, पण त्यावेळी माझ्यासोबत प्रत्यक्षात सगळं घडत होतं. हे सगळं ४५ मिनिटं सुरू होतं. त्यानंतर इंजिनातून आवाज येणं बंद झालं. त्यानंतर सगळे शांत झाले.”
“पुन्हा हसणं, मजा असं चालू झालं. त्यावेळी, सोनाक्षी आणि तिची आईसुद्धा तिथेच होती. त्यांनतर पुन्हा इंजिनाचा आवाज यायला सुरुवात झाली. तो आवाज १० मिनिटं सुरू होता. त्यानंतर मात्र कोणी एक शब्दही बोललं नाही. जोपर्यंत विमान जमिनीवर उतरत नाही, विमानाचे दरवाजे उघडून सर्व प्रवासी बाहेर आले नाहीत, तोपर्यंत कोणीही बोललं नाही.” असं भाईजान मुलाखतीच्या शेवटच्या भागात म्हणाला. सलमान खान लवकरच ‘सिकंदर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.