Shefali Jariwala Death Her Building Watchman Told The Story Of Last Night
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १३’ फेम शेफाली जरीवालाच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. शेफाली हिचं वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या अचानक एक्झिटने तिच्या कुटुंबीयांसह सेलिब्रिटी मित्रांवरही आणि चाहत्यांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पती पराग त्यागी याने शेफालीला रात्री उशिरा अंधेरीतल्या बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेलं. परंतु तो पर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. तिला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. शेफाली ज्या इमारतीमध्ये राहत होती, त्या इमारतीच्या वॉचमनने तिच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. त्याने माध्यमांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
इलियाना डिक्रुझ दुसऱ्यांदा झाली आई, ठेवलं युनिक नाव; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद
शेफाली आणि तिचा पती पराग मुंबईतल्या अंधेरीतील गोल्डन रेज नावाच्या इमारतीत वास्तव्यास होते. तिची अचानक रात्री तब्येत खराब झाल्यामुळे परागने इमारतीतल्या २ ते ३ जणांच्या मदतीने तिला घेऊन रुग्णालयात गेला. या इमारतीचा वॉचमन शत्रुघन महतो याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. मुलाखतीमध्ये वॉचमनने सांगितले की, “रात्रीचे १० किंवा सव्वा दहा वाजले होते. त्याचवेळी गेटमधून गाडी निघाली. गाडी आल्यावर मी लगेच गेट उघडला. आपत्कालीन घटना असल्यामुळे ती गाडी खूप वेगात होती. गाडीच्या काचा काळ्या असल्याने त्यात नेमकं कोण बसलं होतं, ते माहिती नाही.”
“मी परवा शेफाली यांना शेवटचं पाहिलं होतं. ती खूप चांगली होती. ती तिच्या पतीसोबत चालायला निघाली होती. त्यांच्यासोबत त्यांचा कुत्राही होता. शेफाली सर्वांसोबत खूप चांगलं वागायची. तिने कधीच कोणाला अडवलं नाही. तिचा स्वभाव खूप चांगला होता याबद्दल दुमत नाही. रात्री १ वाजता कोणीतरी आलं आणि त्याने फोटो दाखवून मला विचारलं की, यांना ओळखतोस का. त्यांचा मृत्यू झालाय. मला आधी विश्वास बसला नाही. तो व्यक्ती तिचा मित्र होता. मी त्या सांगितलं की, मला माहिती नाही. तुम्ही तिच्या घरी जाऊन चौकशी करा. पण तो घरी न जाता रुग्णालयात गेला. त्यानंतर मध्यरात्री १ वाजता पोलीस आले आणि शेफालीच्या कूकला चौकशीसाठी घेऊन गेले.” अशाप्रकारे शेफालीच्या बिल्डिंगच्या वॉचमनने सर्व घटनाक्रम उलगडला. शेफालीच्या अकस्मात निधनाने तिचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, मध्यरात्री पासूनच शेफालीच्या राहत्या घरी मुंबई पोलिसांची आमि फॉरेन्सिक टीमची रेलचेल पाहायला मिळत आहे. सध्या पोलिस आणि फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरी संपूर्ण घटनेची चौकशी करत आहे. सध्या पोलिस आणि फॉरेन्सिक टीम शेफालीचा पती परागची आणि त्यांच्या घरात काम करत असणाऱ्या कामगारांचीही ते चौकशी करीत आहे. पराग पोलिसांना शेफालीच्या मृत्यू प्रकरणात सहकार्य करताना दिसत आहे.