when vidya balan praised sonali kulkarni after watching her marathi movie doghi
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही एक हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत मराठीसह हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराती आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शिवाय, नाटक आणि एकांकिकेतही तिने काम केलं आहे. ‘दिल चाहता है’, ‘मिशन कश्मीर’चित्रपटांमधल्या तिच्या भूमिका आजही पाहिल्या की तिचा सहज सुंदर अभिनय कळतो. आपल्या सहज सुंदर अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या सोनालीचा ‘सुशीला सुजीत’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनालीचं एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने कौतुक केलं होतं, हा किस्सा अभिनेत्रीने चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सांगितला.
सोनालीने नुकतंच ‘राजश्री मराठी’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, “मी एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी चेन्नईला चालले होते. तेव्हा मी एकटेच होते. एक अतिशय सुंदर मुलगी, तिची आई आणि बहिण असे तिघं होते. विमानात ती एअरपोर्टवर दिसलेली मुलगी मला पुन्हा दिसली. ती मला म्हणाली की “तुम्ही दोघी या चित्रपटात होतात ना?” मी तिला हो म्हटलं आणि विचारलं तुला मराठी कळतं का? तर ती मला म्हणाली हो आणि मला तुझं कामही आवडतं. तो चेहरा माझ्या लक्षात राहिला. मी तिला थँक्यू म्हटलं. तू दिसायला खूप गोड आहेस, असं तिला म्हणून मी निघाले.”
“दुसऱ्या दिवशी माझं जिथे शूट होतं तिथे मला सांगण्यात आलं की, तुम्हाला (मला आणि विद्याला) मेकअप रुम शेअर करावी लागणार आहे. मी म्हटलं ठीक आहे आणि तिथे तीच मुलगी होती. (एअरपोर्टवर दिसलेली मुलगी) मग मी तिला म्हटलं तू अभिनेत्री आहेस? ती म्हणाली हो… तिला मी विचारलं की तुझं नाव काय? तेव्हा तिने सांगितलं की विद्या बालन….” आणि विद्याला हे अजूनही लक्षात आहे.