(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
नवरात्र म्हणजे देवीच्या नऊ रुपांचं महत्त्व सांगणारा, शक्तीचा उत्सव. याच निमित्ताने, अभिनेत्री शिवानी सोनार , जी सध्या “तारिणी” या मालिकेत निडर आणि न्यायासाठी लढणाऱ्या अंडरकव्हर पोलिसाच्या भूमिकेत झळकत आहे, तिने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील एका खास अध्यात्मिक बाजूचा उल्लेख केला. शिवानी म्हणते, “चंद्रघंटा देवी ही माझ्या स्वभावाशी अतिशय जुळणारी आहे. तिचं एक रूप धाडसी, रक्षण करणारी असून दुसरं अत्यंत शांत आणि संयमी असं आहे. माझ्या व्यावसायिक जीवनात मी नेहमीच धाडसी आणि आक्रमक निर्णय घेत आली आहे. नवनवीन भूमिका स्विकारताना धैर्य दाखवत आले आहे. पण जेव्हा गोष्ट माझ्या कुटुंबाची येते, तेव्हा मी खूप शांत आणि समजूतदार असते.
पुढे शिवानी म्हणाली, पूर्वी मी थोडी चंचल होते, पण लग्नानंतर माझ्या आयुष्यात स्थैर्य आलं, दृष्टिकोन बदलला. कलाक्षेत्रात स्थैर्य नसतंच, इथं सतत बदल घडत असतात, भूमिका, संधी, स्पर्धा या सगळ्याच्या मध्यवर्ती राहून मला माझ्या आतल्या शिवानीला शांततेने आणि श्रद्धेने खंबीर केलं आहे. ‘तारिणी’ या भूमिकेमुळे मला माझ्यातली ही दोन रूपं दाखवण्याची संधी मिळाली आहे. ती बाहेरच्या जगात निडर आणि धाडसी आहे, पण आपल्या माणसांत असताना समजूतदार आणि शांतीप्रिय आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात झालेले बदलच या पात्राला अधिक प्रभावी बनवतात,” असं शिवानीने स्पष्ट केलं आहे.
नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंना साजरं करणारा काळ. अशा वेळी, अभिनेत्री शिवानी सोनारने आपल्या व्यक्तिमत्त्वातली देवी ‘चंद्रघंटा’ ओळखली जी एकाच वेळी अत्यंत धाडसी आणि अंतर्मुख शांत आहे. तिचं हे रूप आजच्या काळातल्या अनेक स्त्रियांना आत्मचिंतन आणि प्रेरणा देतं.