Anil Sharma on Bollywood Actors Silence on Pakistan
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ लाँच केले होते. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानामध्ये आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. तेव्हापासून दोन्हीही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध पाहायला मिळत आहेत. या संबंधांमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी आणि पाकिस्तानच्या कलाकारांनी भारताविरोधात अनेक भडकाऊ वक्तव्य केली, त्यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. या सर्वांदरम्यान काही मोजके सेलिब्रिटी वगळता बाकीच्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी मौन बाळगलंय, यामागचं कारण गदरच्या दिग्दर्शकाने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘गदर’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांना विचारण्यात आलं की, बॉलिवूडला कशाची भीती आहे? भारतीय कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पाकिस्तानचे नाव का घेतले नाही. या प्रश्नाचं उत्तर देताना अनिल शर्मांनी सांगितले की, “मी ज्या दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’ झाले त्याच दिवशी मी पोस्ट केली होती. कारण, दहशतवाद हा फार वाईट आहे, देश कोणताही असो, जो देश दहशतवादाला पाठिंबा देतो तो चांगला असू शकत नाही. त्या देशातील सामान्य नागरिक चांगले असतील, त्या देशाचे कलाकार तिथे राहत असल्याने ते भारताविरुद्ध ट्विट करत असतील. पण वाईट गोष्ट अशी आहे की, तुम्ही दहशतवादाला पाठिंबा देत आहात. तुम्ही दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे आहात.”
अभिजित सावंत लग्नानंतर वापरायचा Tinder App, केला धक्कादायक खुलासा; म्हणाला “मी दोन- तीन मुलींसोबत…”
“जेव्हा भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून १०० हून अधिक दहशतवाद्यांना मारले, त्यांचे अड्डे उडवून दिले, तेही थेट पाकिस्तानात जाऊन. तिथले उच्च लष्करी अधिकारी त्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहतात. ते त्यांचे मित्र किंवा नातेवाईक असू शकतात पण टीव्हीवर जे दाखवले गेले त्यावरून, आम्ही त्यांच्यासोबत आहोत हे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत हे कोणत्याही भावनेपेक्षा जास्त वाईट वाटूच शकत नाहीत. असं वाटत होतं, जसं की दहशतवादी त्यांचाच कारखाना होता जो नष्ट करण्यात आला. येणारे मेसेजेस खूपच भयानक आहेत. हे संपूर्ण जगासाठी योग्य नाही. अशा लोकांवर फिल्म इंडस्ट्रीने आणि भारतीय ट्रेडने बहिष्कार टाकायला हवा.” असं मुलाखती दरम्यान दिग्दर्शक म्हणाले.
पुढे दिग्दर्शक अनिल शर्मा यांना, भारतीय कलाकारांना कशाची भीती वाटते? मार्केटिंगची भीती आहे का? की फॉलोअर्स गमावण्याची? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर अनिल शर्मांनी सांगितले की, “तुम्ही स्वतः या प्रश्नांची उत्तरं दिलीत, मी काय उत्तर द्यावं? बॉलिवूडची परदेशामध्ये खूप मोठी बाजारपेठ आहे. त्यापैकी पाकिस्तानी प्रेक्षकांची संख्या खूप जास्त आहे. भारतीय कलाकारांचे पाकिस्तानी फॉलोअर्सही खूप जास्त आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की ही वेळ निघून जाईल. पण बोलल्यास मी माझे फॉलोअर्स गमावेल. माझं जग संपेल, माझ्याकडे ओव्हरसीज मार्केट राहणार नाही, असा विचार बरेच लोक करतात.”
अनिल शर्मा यांनी मुलाखतीत पुढे सांगितले की, “हे बरोबर आहे की चुकीचं आहे, हे मला माहिती नाही. पण तुम्ही ते म्हणाल्यापासून मी तुमच्या विधानाला दुजोरा दिला आहे, मला माहित नाही की हे खरे आहे की खोटे. पण मला तसं वाटत नाही. माझ्यासाठी, देशासमोर काहीही येत नाही. जर देश अस्तित्वात असेल तर आपण अस्तित्वात आहोत. आपण जगात कुठेही गेलो तरी, भारतातील आपली तिसरी किंवा चौथी पिढी अमेरिकेत स्थलांतरित झाली तरी लोक आपल्याला भारतीयच म्हणतील.”