अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून भ्रष्टाचारसंबंधित चौकशी (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे निवृत्त परिवहन विभागाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खरमाटे यांनी निवृत्तीनंतरही वाहतूक विभागाशी संबंधित बैठका आयोजित करून भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश ईओडब्ल्यूला देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चौकशीबाबत घोषणा केली आहे. गेल्या तीन महिन्यांत हॉटेल्समध्ये परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेऊन खरमाटे यांनी विभागाच्या बदल्या आणि कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बजरंग खरमाटे आणि अनिल परब यांच्यातील आर्थिक संबंधांची विविध तपास संस्था चौकशी करत आहेत. आता त्यात ईओडब्ल्यू तपास देखील जोडण्यात आला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बजरंग खरमाटे यांची चौकशी केली आहे. सप्टेंबर 2021 या वर्षामध्ये, नागपूर येथील त्यांच्या घरावर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. यानंतर त्यांना चौकशीसाठी मुंबईत बोलावण्यात आले, जिथे त्यांची आठ तासांहून अधिक काळ सखोल चौकशी करण्यात आली. त्यांचा मोबाईल फोनही तपासण्यात आला.
प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत परिवहन आयुक्तांना भरत लांगे यांनी लिहिलेले पत्र सभागृहात वाचून दाखवले. तसेच आर.आर. रोडवेज प्रा. लिमिटेड, कळंबोली, नवी मुंबई येथील हरिकुमार शर्मा नावाचा खरमाटेचा कलेक्टर आहे. कॉल रेकॉर्ड, सीडीआर तपासा, खंडणीचे महाभयंकर कांड समोर येईल. याबाबतचा अहवाल पाहावा, खरमाटेला अटक करण्यासंदर्भात शासन काय करणार ? तसेच ईओडब्लूकडे याची चौकशी देण्याबाबत भुमिका जाहीर करावी, अशी विनंतीही दरेकरांनी केली
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांच्या शेजारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील बसले होते. यामध्ये अनिल परब म्हणाले की, “माझ्या येथे एका सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे. अख्खा रात्र तो जागते रहो म्हणून ओरडत असतो. आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे,” असा अप्रत्यक्ष टोला अनिल परब यांनी लगावला. सोशल मीडियावर अनिल परब यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. आता मात्र अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.