भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी माध्यमांशी संवाद साधून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Keshav Upadhyay on Reservation : पुणे : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आंदोलन केले. ऐन गणेशोत्सवामध्ये मराठा नेते जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन केले. यानंतर राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. याबाबत जीआर देखील काढण्यात आला. यानंतर काही कॉंग्रेस नेत्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. या मागण्या मान्य केल्यामुळे ओबीसी समाजाचे नुकसान झाले असल्याचा दावा कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यावर भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मंडल आयोग, कालेलकर आयोगाचे अहवाल काँग्रेसच्या सरकारांनी कुजवले असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला आहे.
कॉंग्रेसवर टीका करताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, ओबीसी समाजाची बाजू घेण्याचा आव आणणाऱ्या काँग्रेसचा इतिहास ओबीसी समाजाच्या विश्वासघाताने बरबटलेला आहे. मंडल आयोगाचा आणि त्यापूर्वी काका कालेलकर आयोगाचा ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठीचा अहवाल काँग्रेसच्या सरकारांनी कुजवून टाकला, असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणावरुन टीका करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. ओबीसी समाजाच्या कल्याणाला विरोध करणारे काँग्रेसचे राहुल गांधी, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते आज ओबीसी समाजाला भडकवण्याचे पाप करीत आहेत असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंडल आयोगाबाबत भाष्य करताना भाजप नेते केशव उपाध्ये म्हणाले की, “मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष राजीव गांधी यांनी 6 सप्टेंबर 1990 रोजी लोकसभेत केलेल्या भाषणात विरोध दर्शविला होता. काँग्रेसच्या ओबीसी विरोधी इतिहासाचे वेगवेगळे दाखले देते. 1955 मध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी काका कालेलकर आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती. या आयोगाचा अहवाल त्यावेळच्या काँग्रेस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीपुढे आणलाच नाही. हा अहवाल धूळ खात कुजवत ठेवण्याचे पाप काँग्रेसने केले. मंडल आयोगाबाबत काँग्रेसने याच पद्धतीचे राजकारण केले. मंडल आयोगाच्या शिफारशी इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना कधीच अंमलात आणल्या नाहीत. हे दोन्ही अहवाल कुजवत ठेवून काँग्रेसने आपण ओबीसींचे विरोधक आहोत हेच दाखवून दिले होते. त्यावेळी शरद पवार हे काँग्रेस मध्येच होते. त्यांनीही काँग्रेसचे ओबीसी विरोधी राजकारण मुकाटपणे सहन केले,’ याची आठवणही केशव उपाध्ये यांनी करून देत कॉंग्रेस नेते आणि शरद पवारांवर देखील टीकास्त्र डागले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ओबीसी समाजाची बाजू घेत भाजप नेते केशव उपाध्ये म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासूनच ओबीसी समाजाच्या विकासाचा आग्रह धरला आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी भाजपाचा पाठिंबा असलेल्या व्ही. पी. सिंग सरकारने केली. मोदी सरकारच्या काळातच ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला गेला, अशी भूमिका केशव उपाध्ये यांनी मांडली आहे.