वाईत उमेदवारांची वाढली धाकधूक; निकालाच्या प्रतीक्षेतच तापले राजकीय वातावरण
वाई / सचिन ननावरे : वाई नगरपरिषद निवडणुकीचे मतदान सुरळीत पार पडले असले, तरी कोर्टाच्या आदेशानुसार निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर करता येणार नसल्याने शहरात राजकीय अनिश्चिततेचे सावट गडद झाले आहे. मतदानानंतर नेहमीप्रमाणे निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचते; मात्र, यंदा निकाल विलंबित असल्याने उमेदवारांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांमध्ये संभ्रम आणि तणाव वाढला आहे.
एकूण 11 प्रभागांतील 23 नगरसेवक तसेच नगराध्यक्षपदाचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद असून, कोणत्या प्रभागात कोणती बाजू पुढे असेल, किती मतांची आघाडी लागू शकते. याबाबत शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. निकाल लागेपर्यंत कोणतेही स्पष्ट चित्र दिसत नसल्याने उमेदवारांची ‘कधी एकदा निकाल लागतो’ अशी अवस्था झाली आहे. काही उमेदवार तर अक्षरशः दिवस मोजत बसल्याचे दिसत आहे.
हेदेखील वाचा : Winter Session 2025 :AI द्वारे हिंदू देव – देवतांचे डीपफेक तयार केले तर…; संसदेत खासदार मेधा कुलकर्णी धडाडल्या
या विलंबामुळे उमेदवारांवर मानसिक दडपण वाढले असून, कार्यकर्त्यांना सांभाळणे, अफवांना तोंड देणे आणि वाढत्या चर्चांच्या भोवऱ्यातून मार्ग काढणे ही मोठी कसरत ठरत आहे. निवडणुकीचा उत्साह ओसरत असताना निकालाची प्रतीक्षा मात्र अधिक कठीण होत चालली आहे. उमेदवारांच्या कुटुंबीयांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचीच घालमेल वाढली आहे.
मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे अनेक ठिकाणी समर्थक विविध आकडे, कल, अंदाज आणि अफवांमध्ये हेलकावत आहेत. काहीजण तर मतपेट्यांच्या संख्येवरून सुद्धा हिशेब लावू पाहत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, शहरातील वातावरण शांत व संयमित ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सावध असून सतत आवाहन करत आहेत.
वाई शहरात एकाच चर्चेला उधाण येणार
येत्या काही दिवसांत वाई शहरात एकाच चर्चेला उधाण येणार आहे, कोण जिंकणार आणि कोण हरणार? प्रत्येक प्रभागातील घडामोडींवर सर्वांचे बारकाईने लक्ष केंद्रीत होत आहे. समर्थकांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वत्र राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. अखेरीस, 21 डिसेंबरला निकाल जाहीर होईपर्यंत शहराचे राजकीय तापमान उच्चांकी राहणार असून, उमेदवारांना संयम, प्रतीक्षा आणि अनिश्चिततेची ही परीक्षा सहन करत राहावी लागणार आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: महायुतीचा मोठा निर्णय: घटक पक्षातील नेत्यांना ‘क्रॉस ओव्हर’वर बंदी






