महायुतीचा मोठा निर्णय: घटक पक्षातील नेत्यांना ‘क्रॉस ओव्हर’वर बंदी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतर्गत वाद वाढल्याने समन्वय समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे महायुतीतील घटक पक्षातील कोणत्याही नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला एकमेकांच्या पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. महायुतीतील अंतर्गत फूट थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. घटक पक्षांमध्ये पक्षांतराच्या हालचालींमुळे निर्माण होणारा तणाव टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत महायुतीचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक होणार आहे. त्यात ‘क्रॉस ओव्हर’वर पूर्ण बंदीचा निर्णय औपचारिकपणे मंजूर होण्याची शक्यता आहे. समन्वय समितीच्या निर्णयानुसार, विरोधी पक्षातील कोणालाही महायुतीत सामील करून घेण्यास अडचण नाही. मात्र महायुतीतीलच घटक पक्षांमध्ये परस्पर नेते आणि कार्यकर्त्यांना प्रवेश देणे बंद राहणार आहे. विशेषतः, भाजपने शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना प्रवेश देणार नाही; तर शिंदे सेना आणि राष्ट्रवादीनेही भाजपच्या नेत्यांना पक्षात घेऊ नये, असा परस्पर करार करण्यात येत आहे. राजकीय संतुलन राखण्यासाठी आणि सत्ता समीकरणात तणाव टाळण्यासाठी घेतलेल्या या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना भाजप (BJP) आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कुटुंबामध्ये काम करताना मतभेद असतात पण, आमच्यात मनभेद नाहीत. एकमेकांना आम्ही बोलू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आम्ही पूर्वी जे ठरवलं होतं. त्यामुळे महायुतीतील कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीचा कुठेही पक्षप्रवेश करायचा नाही, यावर एकमत झाले आहे. दोन-तीन दिवसांत याबाबत महायुतीची बैठक होईल. कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश करायचा नाही, आणि भाजपच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश करायचा नाही. तसेच राष्ट्रवादीतही नाही. अशा प्रकारचे कुठलेही निर्णय घ्यायचे नाहीत.
विरोधी पक्षांमधील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यास हरकत नाही. पण महायुतीलील घटक पक्षांमध्येच फोडाफोडी करायची नाही. अशी भूमिका महायुतीतील पक्षांनी घेतली आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमुळेजे वाद निर्माण झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कल्याण-डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्या पूर्वी ठाण्यातही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केले, त्यामुळेही भाजप आणि शिवसेनेत संघर्षाची ठिणगी पडली होती.






