एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत चंद्राहार पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली
Sangli Politics: विधानसभा निवडणुकांनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर अल्या असतानाच ठाकरे गटाचा आणखी एक नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे, नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपली नाराजीही बोलून दाखवली होती. पण हे सर्व सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांनी बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले.
नाशिकमध्ये हे सर्व सुरू असतानाच दुसरीकडे सांगलीतही राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हेदेखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून त्यांना खुली ऑफर असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्यात चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वत: याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
Madhya Pradesh Accident: लग्न सोहळ्यावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ट्रेलर गाडीवर उलटला अन्…
माझ्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या बाबतीत, मी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतली नाही, शिवसेना शिंदे गटाकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर आहे. पण शिंदेंच्या सेनेत जायचे की नाही, याबाबतचा अजून निर्णय घेतला नाही, सध्या मी बाहेरगावी आहे. त्यामुळे या संदर्भात माझ्या कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढचा निर्णय घेईन.’ असं चंद्रहार पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
चंद्रहार पाटील यांनी मागील गुरुवारी (२९ मे) सांगली जिल्ह्यातील विटा येथे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्री सामंत यांचा चांदीची गदा देऊन सत्कार केला. या भेटीनंतर चंद्रहार पाटील लवकरच उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू झाल्या. याआधीही त्यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, विटा आणि भाळवणी येथील घडामोडींमुळे त्या चर्चांना नवसंजीवनी मिळाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, भाळवणी येथे उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजनही चंद्रहार पाटील यांनीच केले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाची शक्यता आता जवळपास निश्चित असल्याचे राजकीय निरीक्षक मानत आहेत.
लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट)कडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, याच मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटीलही इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर सांगलीत महाविकास आघाडीत मतभेद उफाळून आले. उद्धव ठाकरे मात्र चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर ठाम राहिले आणि महाविकास आघाडीच्यावतीने त्यांनाच अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यात आला. परिणामी, काँग्रेसमधून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले विशाल पाटील यांनी भाजप व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करत विजयी मुसंडी मारली.