File Photo : Eknath Shinde
छत्रपती संभाजीनगर: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीचे एकतर्फी सरकार आल्यानंतर देखील अनेक गोष्टींवरुन मतभेद निर्माण झाले आहे. मुख्यमंत्रिपद, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ शिंदे यांनी अनेक बैठकांना अनुपस्थित राहत असल्यामुळे या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
एकनाथ शिंदे यांना महायुतीच्या बैठकांमधून वगळले जात असल्यामुळे टीका केली जात आहे. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, लहान लहान मुलांना आम्ही मोठे केलं. अनेकांना नगरसेवक, उपमहापौर, महापौर केलं. मात्र, तेच लोक आज गद्दार झाले आहेत. पैशांच्या हव्यासापोटी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, गद्दारी करणाऱ्यांचे खूप हाल होतात. आजचं मी पाहिलं एकनाथ शिंदेंना बाजूला केल्याची बातमी आली. गद्दारी करणाऱ्यांची अशीच अवस्था होईल, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर मनसे नेते राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. या भेटीमुळे चर्चांना उधाण आले होते. तसेच अमित ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होतील अशी देखील चर्चा होती. तसेच मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी देखील ही भेट असल्याचे बोलण्यात आले. यावरुन ठाकरे गटाचे नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. याबाबत चंद्रकांत खैरे म्हणाले की, मुंबई महापालिका जिंकण्यासाठी त्यांना वाटलं असेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील म्हणून त्यांना असं वाटलं की राज ठाकरेंना आपल्याकडे घ्या आणि उद्धव ठाकरेंना वेगळंच राहू द्या, असा त्यांचा डाव आहे. मुख्यमंत्री हे खूप हुशार आहेत, बुद्धिमान आहे. मुख्यमंत्री एक एक गेम खेळत असतात. पण तो गेम आता त्यांच्यावर उलटेल. कारण शिंदेंना बाजूला केलं तर शिंदेंचं मोठं बंड होऊ शकतं, भाजपला ओरिजनल ठाकरेंशिवाय पर्याय नाही, असे सूचक विधान देखील ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाकरे गटाचे आमदार अंबादास दावने यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांना टोला लगावत सोशल मीडिया पोस्ट केली आहे. अंबादास दानवे यांनी लिहिले आहे की, “आपत्ती व्यवस्थापन समिती – शिंदे गट बाद.. २. उद्योग विभागाचे निर्णय – शिंदे गट बाद.. ३. रायगड जिल्हा नियोजन समिती बैठक – शिंदे गट बाद सुरुवात झाली आहे.. शिंदे गटाने डावलले जाण्याची सवय अंगवळणी पाडून घ्यावी. तुमच्या योजनांवर फुल्या मारण्याचा सिलसीलाही सुरू झाला आहे!” अशी टीका अंबादास दानवे यांनी देखील केली आहे.