मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मीडिया)
आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशन सुरू
आदित्य ठाकरेंच्या विधानावर फडणवीस यांचे भाष्य
ऐन थंडीत राज्याचे राजकारण तापले
नागपूर: राज्याच्या विधीमंडळामध्ये हिवाळी अधिवेशनला सुरुवात झाली आहे. नागपूरमधील विधीमंडळामध्ये अधिवेशनाचा पहिला दिवस सुरु झाला आहे. दरम्यान राज्याचे राजकारण पहिल्याच दिवशी तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळ्याला लागल्याचा दावा केला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘उद्या असे कोणीतरी म्हणेल की आदित्य ठाकरे यांचे 20 आमदार आहेत, ते भाजपच्या गळाला लागले आहेत. असे कोणाच्या म्हणण्याने थोडच काही घडत असते. शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचे काय आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना आमचा मित्रपक्ष आहे. तीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे आमदार घेऊन करायचे काय आहे? शिवसेना मजबूत होण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. भविष्यात आमची महायुती मजबूत होताना दिसून येईल.”
🕒 2.53pm | 8-12-2025📍Nagpur. LIVE | Media Interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/0iUgQpbKAd — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 8, 2025
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आमदार आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीमध्ये मोठा स्फोट होणार असल्याचे जाहीर केले. तसेच मुख्यमंत्र्यांना 22 आमदार मिळाले असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेल्या वर्षभराचा अभ्यास केला तर त्या आमदारांनी सांगितलेली सगळी कामे झाली आहेत. त्यांना हवा असलेला फंड दिलेला आहे. त्याशिवाय उठ सांगितले तर उठायचे. उडी मार बोलल्यावर उडी मारायची असं ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागले आहेत. नेमकं कुणी यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे त्यांना कळेल. या २२ मधील एक जण स्वतःला व्हाईस कॅप्टन म्हणतो,” असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
आजपासून नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे.






