राज्यातील सद्यस्थितीवर बोट ठेवत यशोमती ठाकूर यांनी गृहखात्याच्या नाकर्तेपणावर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्रातील महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था आज पूर्णपणे कोलमडली असून, गुंड, पुंड आणि मवाली राज्याच्या गृहखात्यावर थयथय नाचत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राज्यात आज इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे जनतेमध्ये हाणामारीच्या घटना घडत आहेत. इतकेच नव्हे तर, कायदा राखणाऱ्या पोलिसांच्या गाड्यांनाही आज डिझेल मिळेनासे झाले आहे, हाच का तुमचा आणि तुमच्या नेत्याचा पराक्रम? असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस जी राहुलजी गांधी यांच्यावर टीका करण्यापेक्षा आधी स्वतःला जोखा! देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षात काय स्थान होते हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो! फडणवीसजी संघाच्या कृपेमुळे मुख्यमंत्री झालात. नाहीतर भाजपमधून तुम्हाला कोण विचारत होते? आपल्यासारखा “माल” ओझे… pic.twitter.com/ce3yYhsSRO — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) May 21, 2026
फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात ‘पोलीस राज’ अवतरल्याचा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला. स्वतःचा हक्क आणि नुकसान भरपाई मागण्यासाठी जेव्हा शेतकरी रस्त्यावर येतो, किंवा पेपर फुटीच्या विरोधात हताश झालेले विद्यार्थी आंदोलनासाठी उतरतात, तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारची पोलीस फौज तात्काळ तयार असते, या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
यासोबतच, राज्यातील विविध गंभीर मुद्द्यांना हात घालत ठाकूर यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सोमनाथ सूर्यवंशी सारखे तरुण आज पोलीस कोठडीत अत्याचाराचे बळी ठरत आहेत, तर दुसरीकडे सहकारी बँकांमध्ये भाजपचेच पदाधिकारी मोठे घोटाळे करून बँका दिवाळखोरीत काढत आहेत, असा आरोप त्यांनी केला. “अजून काय सांगायचं या असल्या ‘माला’ बद्दल!” असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका केली आहे.






