मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?; शिवसेनेच्या मेळाव्यात दिले संकेत
मुंबई : राज्यामध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. राज्यातील बंडखोरीच्या राजकारणानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र यामध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. महायुतीला एकतर्फी पूर्ण बहुमत मिळाले असून ‘न भूतो न भविष्यती’ असा विजय मिळाला. यामुळे राज्यामध्ये अगदी विरोधी पक्षनेते पदावर देखील विरोधातील कोणत्याच पक्षाला दावा करता आलेला नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन मोठी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये चांगले यश मिळाले असले तरी देखील विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून ‘शिव सर्वेक्षण यात्रा’ सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत 36 विधानसभा क्षेत्रांच्या राजकीय परिस्थितीच्या विश्लेषणासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्वांनी उद्धव ठाकरेंकडे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अहवाल सादर करायचा होता. मीडिया रिपोर्टनुसार, या सर्व निरिक्षकांनी आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे सादर केला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे नवीन वर्षांमध्ये त्यांच्या पक्षाची विधानसभा निवडणुकीमध्ये झालेली हानी भरुन काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. जानेवारी महिन्यापासून उद्धव ठाकरे हे सर्व शाखांना भेट देऊन शाखाप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. मात्र तत्पूर्वी 26 तारखेपासून ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरू होणार असून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठका होणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या महानगरपालिकेवर आपला झेंडा लावण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. मुंबईमध्ये आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांचे पूर्ण प्रयत्न सुरु असून मुंबईमध्ये महानगरपालिकेवर सत्ता ठेवणे हे शिवसेना ठाकरे गटासाठी पुढील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये अनेक पदांवर व जागावाटपावरुन जोरदार वादंग झाले होते. तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जागावाटपावरुन देखील वाद झाले होते. तसेच निवडणुकीमध्ये मविआला मोठा धक्का देखील बसला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही ठाकरे गटाने स्वबळा लढावी असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभू्मीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माचोश्रीवर बैठका घेत असून पदाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेत आहेत. मातोश्रीवरील या बैठकीसाठी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार असून जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.