'संजय राऊत पक्षाला कुलूप लावतील'; सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांचा टोला
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटून शिंदेसेनेत दाखल झाले. याची राज्यभर चर्चा सुरु आहे. सहा महिन्यांपूर्वी खासदार फुटणार हे तुम्हाला माहित असूनही तुम्ही काय करत होते ? अशी टीका राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी उबाठा खासदार संजय राऊत यांना लगावला.
पक्षातील कॉमेडी कमी पडली का?
शिवसेनेच्या वर्धापनदिनाबाबत शिरसाट म्हणाले, आम्ही शिवसेनाप्रमुखांचे विचार जपण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी कधीही विचारांशी तडजोड केली नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत ते कधीही गेले नाही. तोच धागा पकडून आम्ही शिवसेनेचे आज मार्गक्रमण करतोय. तर दुसरीकडे उबाठाही मेळावा घेत आहेत. या मेळाव्यात स्टॅन्डअप कॉमेडियनला बोलवण्यात आले आहे. पक्षात सुरु असलेली कॉमेडी कमी पडली का ? असा टोला शिरसाट यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लगावला.
शिरसाट-सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल
मंत्री शिरसाट म्हणाले, सहा महिन्यांपूर्वीच ‘ऑपरेशन टायगर’च्या बातम्या येत होत्या. तेव्हा पक्ष सावध का झाला नाही ? इतके माहित असूनही पदाधिकाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न कोणी का केला नाही. ? राऊत हे हातात कुलूप घेऊनच बसले आहेत. ते पक्षाला कुलूप लावून कधी पळून जातील हेही कळणार नाही असा टोलाही शिरसाट यांनी लगावला. ते भविष्यात पुन्हा खासदार होणार नाही, असे भाष्यही त्यांनी केले.
दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही काँग्रेस पक्षात २०१९ सालीच विलीन झाली असल्याचे शिरसाट म्हणाले. २०१९ पूर्वी ज्या मातोश्रीवर इतर पक्षातील आणि मोठे नेते येत होते. तेच लोक आता सिल्व्हर ओक, राहुल गांधी, सोनिया गांधींकडे जात आहेत. हे पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्ताना आवडत नाहीये. म्हणूनच ते पक्ष सोडून जात असल्याचे शिरसाट म्हणाले. त्यामुळे लवकरच उबाठाचे भवितव्य धोक्यात येणार आहे.






