भाईंदर/विजय काते : निवडणूका ऐन उंबऱ्यावर येऊन ठेपल्या असताना मतदार यादीत सावळा गोंधळ झाल्याचं समोर आलेलं आहे. मीरा-भाईंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या. एका प्रभागातील 20 ते 30 टक्के मतदारांची नावं थेट दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रभागात टाकण्यात आली. याप्रकरणावर नागरिक, संघटना आणि राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. गुरुवारपासून याद्या घेण्यासाठी इच्छुकांकडून पालिकेत मोठी गर्दी झाली. याद्यांमधील झालेला बदल पाहून नागरिकांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.
महापालिकेने 24 प्रभागांच्या प्रारूप याद्या हरकती व सुचना नोंदविण्यासाठी जाहीर केल्या आहेत. वेबसाइटवरही याद्या उपलब्ध असल्या तरी, विविध प्रभागांत मतदारांची ‘अदलाबदल’ झाल्याने पहिल्याच दिवशी तीन हरकती पालिकेकडे दाखल झाल्याची माहिती मिळाली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, माजी नगरसेवक राजीव मेहरा आणि जुबेर इनामदार यांनी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन गंभीर तक्रारी केल्या. तब्बल30 टक्के मतदारांचे प्रभाग बदलून टाकण्यात आले असून, अनेक गृहसंकुलांची नावे चुकीच्या प्रभागांमध्ये समाविष्ट असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
“सुधारित याद्या आधी प्रकाशित करा आणि मग हरकतींसाठी मुदत वाढवा,” अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आयुक्तांनी सुधारणा केली जाईल, असे आश्वासन दिले असले तरी, काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगातही तक्रार दाखल केली आहे.
जुबेर इनामदार यांनी “भाजप आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने मतांची चोरी करण्याचा पुरावा” असल्याचा आरोप केला. मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनीही असा आरोप केला की, विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्यानंतर आता महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे. “बोगस मतदार वगळलेले नाहीत, उलट लक्ष विचलित करण्यासाठी प्रभागांत गोंधळ निर्माण केला आहे,” असे ते म्हणाले.
महिला जिल्हा संघटक नीलम ढवण यांनी प्रभाग ३ मधील इमारती प्रभाग 4 आणि 11 मध्ये, तर इतर प्रभागातील इमारती प्रभाग 3 मध्ये टाकल्याचा आरोप केला.
प्रभाग 10, 4, 11, 8, 17, 21, 16, 9, 19, 22 अशा अनेक प्रभागांत नावांची अदलाबदल केल्याचेही त्यांनी सांगितले.
माहितीनुसार, महापालिका निवडणुकीसाठी विधानसभा मतदार याद्यांवर आधारित प्रभागनिहाय विभागणीचे काम महापालिकेच्या कर विभागाने केले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून केली जात आहे. प्रारूप मतदार याद्यांतील मोठ्या प्रमाणातील गोंधळामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुढील सुधारित यादीत हे दोष दूर होणार का, आणि नागरिकांच्या हरकतींवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






