नंदिनीमध्ये महाराणी माधुरी हत्ती परतल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी कोल्हापूरकरांचे अभिनंदन केले (फोटो - सोशल मीडिया)
Rohit Pawar Marathi News : पुणे : मागील अनेक दिवसांपासून महाराणी माधुरी हत्तीण ही जोरदार चर्चेमध्ये आली होती. माधुरी हत्तीण हिला गुजरातमधील अंबानींच्या वनतारामध्ये पाठवण्यात आले होते. जैन मठामध्ये मागील तीन दशकांहून अधिक काळ राहिलेली माधुरी कोल्हापूर सोडून गेल्यामुळे मोठा जनआक्रोश निर्माण झाला होता. कोल्हापूरकरांना मुक मोर्चा आणि जोरदार विरोध दर्शवत माधुरीला परत आणण्यासाठी प्रयत्न केले. याचे फळ आता कोल्हापूरकरांना मिळाले आहे. वनताराकडून नांदणीमध्ये माधुरीसाठी योग्य सोय केली जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोल्हापूरकरांचे कौतुक केले आहे.
आमदार रोहित पवार यांनी महाराणीला नांदणीमध्ये परत आणण्याच्या लढ्याला यश आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी कोल्हापूरकरांसाठी खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, कोल्हापूरकर मानलं राव तुम्हाला!!! शेवटी तुम्ही विषयाचा कंडका पाडलाच.. कोल्हापूरकरांच एकदा ठरलं की ठरलं!!! अखेर नांदणी मठातील महादेवी हत्ती परत येणार ही बातमी ऐकून माझ्यासारख्या राज्यातील लाखोंना निखळ आनंद झाला. विषय अस्मितेवर आला की मराठी माणूस कसा एकजुटीने मोठा लढा देतो हे संपूर्ण देशाने पाहिलं. या लढ्यातही सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित आवाज उठवला. हाच एकोपा टिकवून येत्या काळात महाराष्ट्रद्रोह्याचाही बंदोबस्त आपल्याला करावा लागेल आणि तो आपण करूच…! असा म्हणत रोहित पवार यांनी कोल्हापूरकरांचे कौतुक केले आहे.
कोल्हापूरकर मानलं राव तुम्हाला!!!
शेवटी तुम्ही विषयाचा कंडका पाडलाच..
कोल्हापूरकरांच एकदा ठरलं की ठरलं!!! अखेर नांदणी मठातील महादेवी हत्ती परत येणार ही बातमी ऐकून माझ्यासारख्या राज्यातील लाखोंना निखळ आनंद झाला. विषय अस्मितेवर आला की मराठी माणूस कसा एकजुटीने मोठा लढा देतो हे… pic.twitter.com/0torgeEogi — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वनताराच्या अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नांदणीमध्ये येऊन मठाधिपतींशी बोलणी केली. सुमारे दोन तास विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर नांदणी मठ, वनतारा, राज्य सरकार सर्वजण मिळून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा महादेवी हत्ती नांदणी मठात आणला जाणार आहे. याचिकेमध्ये वनतारामध्ये हत्तीसाठी जी व्यवस्था करण्यात आली आहे, तशाच पद्धतीची व्यवस्था या मठामध्ये करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘आम्ही ही याचिका पेटा आणि एचपीसी यांच्या पाठिंब्याने दाखल करणार आहे’. तसेच कोल्हापूरवासियांना दुखावण्याचा आमचा प्रयत्न नाही. सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे, त्यावर आम्ही काम करत होतो. सगळ्यांनी समजून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार ही त्यांनी यावेळी मानले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मालकी हक्क नांदणी मठाकडे राहणार
हत्ती परत आणल्यानंतर याचा मालकी हक्क नांदणी मठाकडे राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. हत्तीची देखभाल, वैद्यकीय व्यवस्था मात्र वनतारा पुरवणार आहे. ती परत येईपर्यंत वनताराने आम्हाला तसेच अनंत अंबानींनी सुद्धा सहकार्य करावे. आमचा त्यांना आशीर्वाद असेल, असे महास्वामिनींनी सांगितले.