आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या अचानक झालेल्या दिल्लीवारीवरुन संशय व्यक्त केला आहे (फोटो- टीम नवराष्ट्र)
Rohit Pawar News : मुंबई : सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी रंगली आहे. विविध विकास कामांवरुन आणि मुद्द्यांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अधिवेशन सोडून दिल्ली गाठली आहे. एकनाथ शिंदे यांनी तातडीने सर्व ठराविक कार्यक्रम सोडून दिल्ली गाठल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. यावरुन आता शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.
आमदार रोहित पवार यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यामागे महायुतीमधील अंतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याचा दावा केला. “एकनाथ शिंदेच्या पक्षातल्या काही नेत्यांवर आणि कदाचित त्यांच्या कुटुंबीयांनादेखील प्राप्तीकर विभागानं काही नोटीसा पाठवल्या आहेत. कदाचित एकनाथ शिंदेना असं वाटत असेल की आतल्याआत काही कुरघोड्या होत आहेत का? त्याचीच स्पष्टता घेण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असावेत”, असा मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांना ईडीची नोटीस आली आहे. याबाबत त्यांनी पुष्टता दिली आहे. यावरुन देखील रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांकडे प्राप्तीकर विभागाच्या नोटीसा जात नाहीत. पण एकनाथ शिंदेकडेच या नोटीसा जातात हे मात्र अभ्यास करण्यासारखं आहे. कदाचित मुंबई महानगर पालिकेसाठी एकनाथ शिंदेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय असं चित्र आता दिसतंय”, असे देखील आमदार रोहित पवार म्हणाले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दिल्लीवारीवरुन जोरदार टीका केली जात आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन एकनाथ शिंदेंना डिवचले. ते म्हणाले की, गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्य मंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले! धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले, दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले! त्यानंतर: मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली! तूर्त इतकेच! बाकीचा तपशील लवकरच! असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्य मंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले!
धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले,
दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले!
त्यानंतर: मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी…— Sanjay Raut (@rautsanjay61) July 11, 2025