मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काश्मीरमधील पहलगाम या लोकप्रिय पर्यटनस्थळावर हल्ला करुन 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये धर्म विचारुन बेछुट गोळीबार करण्यात आला. पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्याबाबत संपूर्ण देशातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भारताने देखील पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तान जगाच्या नकाशावरून कायमचा नष्ट करावा अशी आक्रमक भूमिका मनसे पक्षाने घेतली आहे.
पहलगाम हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील आहे. पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या परिवारासह संपूर्ण शहरातून नागरिकांनी भावपूर्ण निरोप दिला. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मनसे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. यानंतर त्यांनी पहलगाम हल्ल्याच्य़ा भारताने बदला घ्यावा असे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले बाळा नांदगावकर?
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “पहलगाममध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या पुण्यातील दोघांच्या अंत्यसंस्काराला मी वैकुंठला गेलो होतो. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या अंत्यविधीला मी उपस्थित होतो. जगदाळेंची मुलगी आसावरी हिला देखील भेटलो. त्यांनी हल्ल्यावेळी झालेली घटना आणि माहिती सांगितली ती ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी एवढंच सांगू इच्छितो की, भारतातील आता सर्वच लोकांनी एकत्रितपणे येऊन या पाकिस्तान नावाचा देश जगाच्या इतिहासावरुन मिटवला पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका मनसे नेते बाळी नांदगावकर यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “पाकिस्तानमध्ये आंतकवादाला पोसलं जाते. दुर्दैवाने आत्तापर्यंत आपण सर्व करार पाळले. 1972 साली इंदिरा गांधी यांनी केलेला शिमला करार हा आपण पाळला. या करारा अन्वयी आपल्याला LOC पार करता येत नव्हती. आता मात्र त्यांनीच तो करार तोडला असल्यामुळे आता LOC पार करुन काश्मीरव्याप्त म्हणजे आपल्याच देशाचा भाग असलेला POK तो ताब्यात घेतला पाहिजे. शाहबाज शरीफ हा पाकिस्तानचा कथित पंतप्रधान आहे त्याला सांगितलं पाहिजे तेरे हाथ मैं वो लकीर नहीं, अन् कश्मीर तेरे बाप की जहागींर नहीं,” अशा शब्दांत बाळा नांदगावकर यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“काश्मीर आमचं आहे आणि आमचंच राहणार आहे. त्यामुळे तिकडे राहणारे जे मुस्लीम बांधव आहेत, त्यांना देखील आम्ही सांगू इच्छितो की, तुम्ही त्या लोकांना सहकार्य करणार असाल, तुमच्या घरामध्ये त्यांना थारा देणार असाल, तर उद्या तुमच्यावर सुद्धा हा देश बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही. तुमचे खायचे प्यायचे वांदे होऊन जातील. आता अंतिम निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. पाकिस्तानबाबत अंतिम निर्णय देश, देशातील जनता आणि केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा बाळगतो,” अशी भूमिका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.