उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली (फोटो - टीम नवराष्ट्र)
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले. संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 11.30 वाजता हे शिवतीर्थावर एकत्र येणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद घेऊन आणि त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्राच्या एका ऐतिहासिक पर्वाची ते सुरुवात करणार आहेत. आजचा दिवस यामुळे अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर 12वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा होणार आहे,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरे- राज ठाकरे आज युतीची अधिकृत घोषणा करणार; मुंबईत घडामोडींना वेग
संजय राऊत पुढे म्हणाले की, “आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मंगलमय आहे. मला तर त्या दिवसाची आठवण येत आहे ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला आणि मराठी माणसांनी सण साजरा केला. अशा प्रकारे मराठी ऐक्याचा आजचा दिवस आहे. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मंगल कलश महाराष्ट्राला अर्पण केला आहे. कोण भडभुंजे काय बोलत आहे याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हे सगळे लाचार आणि बुटचाटे लोक आहेत. त्या दिल्लीच्या बुटचाट्यांनी त्यांचं राजकारण करावं. त्याने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करु नये. ठाकरे बंधूंच्या या युतीमध्ये त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : युनूस सरकारचा दुटप्पी चेहरा! एकीकडे व्हिसा सेवा स्थगित, तर दुसरीकडे भारताशी मैत्रीचे सुरु
पुढे ते म्हणाले की, “मुंबईमध्ये मराठी माणूस एक आहे आणि एक राहिल. आणि मराठी माणसांचं नेतृत्व ठाकरे बंधू करत आहेत. आज त्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे या महापालिकांच्या जागावाटपा संदर्भात आमची चर्चा झाली आहे. याशिवाय इतर महापालिकांमध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे युती करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर काम सुरु आहे,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.






