दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकत्र बसल्यामुळे संजय राऊत आक्रमक (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्या चर्चा होत्या. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार आणि कौतुक केले. दिल्लीमध्ये केलेल्या या सत्कारामुळे राज्याचे राजकारण रंगले. ठाकरे गटाने शरद पवारांवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. खासदार संजय राऊत यांनी देखील जोरदार टीका केली होती. आता या टीकेनंतर दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत. याबाबत खासदार राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “शरद पवार यांच्याशी कसला रुसवा फुगवा? एका विषयामध्ये आम्ही शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या. महादजी शिंदे यांच्या नावाने ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो, त्यांनी असं कुठलं महान कार्य केलं? महाराष्ट्र सदरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. लोकांचा गैरसमज झाला की मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची फसवणूक झाली. हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता खाजगी कार्यक्रम होता. आमच्याकडे अशा अनेक खाजगी संस्था पुरस्कार देत असतात. मराठी साहित्य परिषदेची परवानगी न घेता मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. संमेलनाचं नाव वापरून गैरवापर करून हा पुरस्कार देण्यात आला, येथे आमचा आक्षेप आहे. शरद पवार यांच्यासारख्या व्यक्तीला सुद्धा अंधारात ठेवलं गेलं,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार राऊत म्हणाले की, “नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे. दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आमचे एखाद्या व्यक्ती विषयीचे मत टोकाचा आहे, शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा आमचं तेच मत आहे. आमचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी फोडला. या लोकांना हाताला धरून या सगळ्या संदर्भात चर्चा शरद पवारांशी कशा बाबत करावी?आमचा आणि शरद पवार यांचे भांडण नाही, आम्ही आमचे मत मांडलं भूमिका मांडले. त्यांची भूमिका वेगळी असेल, आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे तसा त्यांना सुद्धा आहे. एकनाथ शिंदें बाबत त्यांनी जे भाषण केले ते ऐतिहासिक आहे असं काय महान कार्य केलं ? महादजी शिंदे पुरस्कार देताना जे भाषण केलं ते इंटरेस्टिंग आहे,” असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “सत्तेचा गैरवापर करून लोकांना दणका देऊन दिल्ली पुढे झुकणारे लोक आहेत. सरपटणारे लोक आहेत त्यांना तुम्ही महादजी शिंदे पुरस्कार देता. तर त्या संस्थेची चौकशी व्हायला हवी. शिंदे यांचा बालेकिल्ला कुठलाच नाही पैशांनी बालेकिल्ले घेतले. असं कोणतं महान कार्य एकनाथ शिंदे यांनी केलं ते काय लोकमान्य टिळक आहेत? वल्लभभाई पटेल आहेत. दीनदयाळ उपाध्याय आहेत? त्यांची अशी कुठली विचारधारा आहे ज्यांनी बालेकिल्ले उभे झाले. ज्या दिवशी अमित शहा नसतील त्या दिवशी बालेकिल्ले का टेकड्या सुद्धा यांचे नसतील,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.