सुधाकर बडगुजर यांच्या भाजपवरील प्रवेशावरुन खासदार संजय राऊत आक्रमक झालाआहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. अनेक नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून बैठकींचे सत्र देखील वाढले आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकावर वर्चस्व मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या नाशिकच्या स्थानिक नेत्यांचा विरोध असताना देखील हा पक्षप्रवेश पार पडला आहे. यामुळे आता ठाकरे गटाने भाजपला डिवचले आहे.
ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुधाकर बडगुजर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, “भाजपा बकवास पक्ष आहे. देश द्रोही हा शब्द लागू होतो. देशातील सत्ता भ्रष्ट लोकांच्या आधाराने घेतली. मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. भारतीय जनता पार्टी भंगार गोळा करून मोठा झालाय. 90% आमदार आमचे आहेत, अशा गंभीर शब्दांत खासदार राऊत यांनी निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांची चाल तिरकी असते. त्यांना सलीम कुत्ता चालतो, उद्या दाऊद चालेल. मी वारंवार तेच सांगत होतो, शरद पवार अशा लोकांना सोबत घेणार नाहीत. जे संधीसाधू तिकडे गेलेत, आम्ही त्यांचा विचार देखील करत नाही. भारतीय जनता पक्षाने सलीम कुत्ता याला संत म्हणून पदवी दिलीय” अशी टीका संजय राऊत यांनी केली. सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचा पार्टीमधील एक फोटो व्हायरल झाला होता. यावरुन भाजपने त्यावेळी आक्रमक भूमिका घेतली होती.
विरोध नाही पण सक्ती नको
राज्यामध्ये हिंदी भाषा प्राथमिक शाळांमध्ये शिकवण्यावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. तसेच मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इच्छुक विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “शैक्षणिक धोरण भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोईसाठी केलं जातं. आम्ही हिंदीला विरोध केला नाही. पण सक्ती नको” अशी भूमिका संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या वतीने मांडली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत म्हणाले की, “उद्या मूळ शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन आहे. डुप्लिकेट शिवसेनेचा नाही. यावेळी उद्धव ठाकरेही अनेक विषयांवरील आपल्या भूमिका स्पष्ट करतील. ज्याबद्दल लोकांच्या मनात काही शंका आहेत, संभ्रम आहे, उत्सुकता आहे, असे अनेक विषय आहेत, ज्याबद्दल उद्धव ठाकरे नक्कीच बोलतील”, असे देखील मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.