भारतीय संघाने आशिया कप 2025 ची ट्रॉफी पाकिस्तान मोहसीन नक्वीकडून न घेतल्याने खासदार संजय राऊत यांनी टीका केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Sanjay Raut On Asia Cup 2025 : मुंबई : आशिया कप 2025 मध्ये (Asia cup 2025) भारतीय क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. फायनल सामन्यामध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताने विजय मिळवला. सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात अनपेक्षित वळण आले. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष व पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे भारतीय संघाला ट्रॉफी मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र यावेळी त्यांनी भारतीय संघावर देखील नाराजी व्यक्त केली.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थितीसह भारत-पाक सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होऊ नये अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून सुरुवातीपासून केली जात आहे. पहलगामवर हल्ला झाल्यामुळे आणि यामध्ये 26 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पाकिस्तानसोबत सामना होऊ नये अशी मागणी केली जात होती. मात्र भारत आणि पाकिस्तानचा कोणताही सामना रद्द झाला नाही. तसेच अंतिम सामना देखील दोन्ही संघामध्ये झाल्यामुळे जोरदार टीका विरोधकांनी केली. तसेच राज्यातील सर्व पीव्हीआर मधील भारत-पाक सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग शिवसेना ठाकरे गटाकडून रद्द करण्यात आले. यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत टीकास्त्र डागले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तानबरोबर खेळायला विरोध आहे ही लोकभावना आहे. काल अनेक ठिकाणी मॅच दाखवण्याचा प्रयत्न झाला तो आम्ही हाणून पडला. काल भारतीय संघ जिंकला असं कळलं. तुम्ही ट्रॉफी घ्यायला नकार दिला पण तुम्ही खेळतात. तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? ही नौटंकी आहे. तुम्ही मैदानावर खेळत आहात. देशाच्या पंतप्रधानांकडून ही प्रेरणा घेतली आहे. जय शाह आल्या पासून भारतीय क्रिकेट बोर्डात महाराष्ट्र दिसत नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भारतीय संघाच्या (ACC) अध्यक्ष व पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न घेण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
ते उंटावळून शेळ्या हाकतात
त्याचबरोबर राज्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून ओला दुष्काळ आला आहे. यामुळे सरकारने मदत करावी अशी अपेक्षा विरोधकांकडून केली जात आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, अतिवृष्टी थांबत नाही आहे. हा निसर्गाचा प्रकोप आहे. निसर्ग कोपला की त्याच्याशी सामना करणाऱ्या शासकीय यंत्रणेने तत्परतेने उतरून मदत करायची असते. महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आहे तर महाराष्ट्रातील जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे आहे. ते उंटावळून शेळ्या हाकत आहेत, त्यामुळे ही परिस्थिती आली असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, पूरग्रस्त ठिकाणी गेले नाही मुख्यमंत्री आता जाताना दिसत आ दुर्गम शोषितांच्या गावात हे पण मदतीचं काय? आजही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. जिथे सरकार पोहोचत नाही तिथे विरोधक पोहोचतात म्हणून विरोधी पक्ष नेत्याची गरज आहे कारण तो आरसा दाखवतो. 50 हजार हेक्टरी हे नुकसान मिळण गरजेचं आहे. आणि कर्जवसुली थांबवा. सरकारकडे भरपूर पैसे आहे उधळायला कंटेनरच्या कंटेनर आहेत. काल मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही वेदना दिल्ली दरबारी मांडायला हवी. त्यांनी बंड केलं पाहिजे. मुख्यमंत्री पदाची पणाला लावली पाहिजे. मदत केली म्हणजे तुम्ही उपकार करतात का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.