खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. डिसेंबर महिन्यामध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराडचे नाव समोर आले होते. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जवळचे संबंध असल्याचा आरोप करत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. प्रचंड रोष आणि प्रेशरनंतर अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी संशय व्यक्त केला आहे.
धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा घेतला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. याचबरोबर धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत नैतिकतेवरुन राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे. यावर आता शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी संशय व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “संतोष देशमुखांच्या हत्येत ज्या कोणाचा हात असेल त्या प्रत्येकाला चौकात फाशी द्यायला हवी. दिल्लीत जाऊन मी आणि बजरंग सोनवणे लवकरचं अमित शाह यांना भेटणार आहे. आत्तापर्यंत जे घडलं ते शाह यांच्या कानावर घालणार आहे. खंडणी हा गुन्हा देशात खूप मोठा गुन्हा आहे. मनमोहन सिंग सरकारनं पीएमएल घेतला आहे. समाज म्हणून राज्य म्हणून हे कारवाई होत नाही हे आपलं दुर्दैवी आहे. एवढे मोठे सरकार आहे. एवढी संख्या आहे. खंडणी, कृषी घोटाळा, यासाठी मत दिले आहेत,” असा घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पुढे खासदार सुप्रिया सुळे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असल्याच्या टीकेवर उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, “नैतिकता की वैद्यकीय कारणाने राजीनामा दिला, हे आधी स्पष्ट करा. ही माणसं नाहीत, हैवान आहेत. फोटो पाहून राज्य हळहळतोय. बीड हे सुसंस्कृत शहर आहे, तिथं हे हैवान आहेत. अजित पवार आणि छगन भुजबळ यांना हा नैतिकतेने निर्णय घ्यावा, असं वाटलं असेल. मी विरोधात आहे, म्हणून विरोध करणार नाही. मी त्याचा स्वागत करेन. मी या दोन्ही नेत्यांचा आदर करते, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. पण मुंडे म्हणतात वैद्यकीय कारणाने राजीनामा दिला. ही काय चेष्टा लावली आहे का? याचं उत्तर द्या. सर्व नेत्यांनी जे आरोप केलेत याची पारदर्शक तपासणी व्हायला हवी”, अशी स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “धनंजय मुंडेंनी ट्विट केलंय. दुसरीकडे अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलं. पण धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये नैतिकतेमधील ‘न’ चा ही उल्लेख केलेला नाही. हा किती मोठा विरोधाभास आहे. एकीकडे नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय अन दुसरीकडे वैद्यकीय कारण मुंडेंनी दिलंय. यातून मोठा विरोधाभास दिसतो. हे खूप भयानक आहे, जी चार्जशीट बाहेर आली. त्यातील फोटो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाहिले असतील ना? मग राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला? वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संवाद हत्येच्या अर्धा तासांमध्ये झालाय, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? 84 दिवस याकडे कानाडोळा केला. आता काय म्हणतात नैतिकतेवर राजीनामा दिला. पण ज्यांनी राजीनामा दिले ते वैद्यकीय कारणाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं. आहे राज्याला किती फसवणार? सगळा राज्य हताश झालाय,” असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.