धारशिवमध्ये राजकारण तापले (फोटो- सोशल मीडिया)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर
2 डिसेंबरला मतदान तर 3 तारखेला लागणार निकाल
धाराशिव नगरपालिकेची निवडणूक होणार रंगतदार
धाराशिव: २ डिसेंबर ही मतदानाची तारीख जसजशी जवळ येते आहे, तसतसे नगरपालिकेच्या निवडणुकीत रंग भरू लागले असून शिवसेना (उबाठा) काँग्रेस आघाडीने सोमवारी (२४ नोव्हेंबर) संयुक्तरित्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी जाहीरपणे झडू लागल्या असून एकमेकांवर टिकांचा भडिमार केला जात आहे. आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर ओम राजेंनी भाजपावर जोरदार प्रहार केले असून धाराशिव नगरपालिकेची निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे. यामुळे शिवसेनेच्या नगरध्यक्षपदाच्या उमेदवार संगीता सोमनाथ गुरव आघाडीच्या सर्व उमेदवारांसह भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील धारसुरमर्दिनी मंदिरात देवींना नारळ वाढवून, हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहेमतुल्ला अलै यांच्या दर्ग्यात चादर चढवून, शहरातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आघाडीच्या, प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, विश्वास शिंदे, मकरंद राजेनिंबाळकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मागील दहा वर्षांच्या काळात नगरसेवक म्हणून कार्यरत असताना आणि प्रशासकीय काळात सोमनाथ गुरव यांनी केवळ आपल्याच प्रभागातील नव्हे, तर शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांच्या समस्येला आपली स्वतःची समस्या समजून न्याय मिळवून दिला आहे. शहरातील नागरी समस्या असा ग्रुप काढून त्यातून शहरातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी निस्वार्थपणे केले आहे. आता त्यांच्या सहचारिणी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवार म्हणून जनतेला आशीर्वाद मागत आहेत. सोमनाथ गुरव यांचे मागील काम पाहून जनता निश्चितच या मध्यमवर्गीय सर्वसामान्य घरातील महिलेस नागराध्यक्षपदी विराजमान करतील असा विश्वास त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
मशाल चिन्ह असलेले सेनेचे भगवे आणि हाताचा पंजा चिन्ह असलेले काँग्रेसचे तिरंगी गमछे गळ्यात घालून, भगवे आणि तिरंगी झेंडे फडकवत घोषणांच्या गजरात, हलगी, ढोल आणि तशा आदी वाद्यांच्या गदारोळात शहरातील मुख्य रस्त्यावरून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना व काँग्रेस पक्षाचे नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार सहभागी होते. रॅलीत लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






