'लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही'; नवनीत राणांचा मोठा दावा (फोटो सौजन्य-X)
माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्यसभेच्या खासदारकीबाबत मोठे वक्तव्य करत आपण स्वाभिमानाशी तडजोड केली नसल्याचा दावा केला आहे. अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, “लोक नगरसेवकपदासाठीही लोटांगण घालतात, पण मी स्वाभिमानी असल्याने राज्यसभेसाठी कधीही दुसऱ्यांच्या दारी गेले नाही. त्या संधीला ठोकर मारली,” असे म्हटले.
यावेळी त्यांनी आपण माजी खासदार झाल्याची वेदना असल्याचे सांगत विरोधकांना अप्रत्यक्ष इशाराही दिला. “मी शांत आहे, पण शेरनी शांत असली तरी गर्जना करायला विसरत नाही,” असे त्या म्हणाल्या.
काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या की, त्या कधीही शासकीय कार्यक्रमात मंचावर जाण्याचा आग्रह धरत नाहीत. विरोधकांना शुभेच्छा दिल्या म्हणजे आपण शांत बसलो आहोत, असा अर्थ काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांविषयी बोलताना राजकीय नेत्यांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे सांगत त्यांनी स्वतः कधीही मर्यादा ओलांडली नसल्याचा दावा केला.
राज्यसभेच्या चर्चांवर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, “माझा स्वाभिमान इतका मोठा आहे की, राज्यसभेसाठी मी कोणाच्याही दारात गेले नाही. माझ्या विचारांशी तडजोड करण्यापेक्षा मी ती संधी नाकारली.” तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार रवी राणा यांच्या पाठीशी असल्याने मतदारसंघातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नवनीत राणा म्हणाल्या की, “ते मुख्यमंत्री असताना त्यांना हनुमान चालीसा नको होती. सत्ता गेल्यानंतरच त्यांना राम आणि हनुमानाची आठवण झाली.”
त्यांनी पुढे आरोप केला की, मुख्यमंत्री असतानाच हनुमान चालीसा वाचली असती तर पक्षातील फूट, आमदारांचे बंड आणि पक्षाची पडझड टळली असती. तसेच स्वतःला तुरुंगात जावे लागलेल्या 14 दिवसांचा अनुभव आपण कधीही विसरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.






