पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली (फोटो - टीम नवराष्ट्र)
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये वैष्णवी हगवणे सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. वैष्णवी हगवणे ही राजेंद्र हगवणे यांची सून आहे. राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष होते. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. या प्रकरणामध्ये राजकीय दबाव असल्याचे देखील बोलले गेले. तसेच शशांक आणि वैष्णवी यांच्य़ा लग्नामध्ये अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. याचे फोटो देखील व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच कोणाच्या लग्नाला जाणे ही काय माझी चूक आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “तुम्ही घरचे लोक आहात मी सांगतो, तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलावता. शक्य असेल तेवढं यायचा मी प्रयत्न करतो, त्या भागात असेन तर उशिरा का होईना मी लग्नाला हजेरी लावतो. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, आणि त्यांनी नंतर त्यांच्या सुनेला काही वेडवाकडं केलं, त्रास दिला तर तिथे माझा काय संबंध आहे?” असा थेट सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “अजित पवारांनी त्यांना सांगितलं का असं कर म्हणून? मला तर काही कळतच नाही. ही घटना घडल्या घडल्या मी पिंपरी-चिंचवडच्या सीपींना म्हटलं की, कोणी का असेना अॅक्शन घे. ज्या मुलीने आत्महत्या केली तिथी सासू, नणंद, नवरा आत जेलमध्ये आहेत. सासरा पाळलाय, पण ते पळून पळून कुठे जाईल? मी आजपण सांगितलं, 3 टीम शोधासाठी पाठवल्यात, तिथे 3 नाही 6 टीम्स पाठवा, मुसक्या बांधूनचं आणा त्याला,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी राज्यातील लाडकी बहीण योजनेचा देखील उच्चार केला. ते म्हणाले की, “मीच लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये द्यायला सुरूवात केली, याआधी कोणीच याची सुरूवात केली नव्हती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी. आम्ही मिळून या योजनेची सुरूवात केली. आणि तिथे ते चॅनेलवाले खुशाल म्हणतात अजित पवारांना जाब विचारला पाहिजे. जर अजित पवार तिथे दोषी असतील, कुठे तिथे संबंध असेल तर फासावर लटकवा पण उगीच माझी बदनामी कशाला, काही घेणं न देणं,” अशा शब्दांत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.