आमदार विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला आव्हान देण्यात आले आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्याचे नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले. यंदाचे अधिवेशन हे धनंजय मुंडे राजीनामा, अबु आझमी निलंबन, औरंगजेब कबर, नागपूर दंगल आणि कुणाल कामरा अशा अनेक मुद्द्यांवरुन यंदाचे अधिवेशन गाजले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी दोन दिवसांपुर्वीच बिनविरोध निवड झाली. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला आव्हान देण्यात आले आहे.
अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे हे पुण्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांनी अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. बनसोडे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा सुलक्षणा शीलवंत-धर यांनी याचिकेतून आरोप केला आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली आहे. येत्या 2 एप्रिल रोजी अण्णा बनसोडे यांना कोर्टाने उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवार गटातील अण्णा बनसोडे यांनी आमदारकीची हॅटट्रीक केली आहे. पिंपरी मतदारसंघातून यंदा ते तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर अण्णा बनसोडे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवण्याची मनिषा होती. मात्र, तीन पक्षांची युती असल्याचे मंत्रिपदं देण्यामध्ये अनेक अडचणी आल्या. मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद देताना महायुतीच्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच दिसून आली. यामुळे अण्णा बनसोडे यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपदं मिळालं नाही. मात्र, अजित पवारांनी त्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदी संधी दिली आहे. याशिवाय विविध समित्यांवर त्यांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अण्णा बनसोडे यांनी आपली ओळख निर्माण केली असून कामाबद्दल त्यांना पद देखील मिळाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पिंपरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात महापालिकेच्या निवडणुकीपासून झाली. राजकारणात येण्याआधी ते पान टपरी चालवत होते. नंतर त्यांचा राजकारणाशी संबध येत गेला. पुढच्या काळात ते राजकारणात सक्रीय झाले. दरम्यान १९९७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक म्हणून निवडून आले. २००२ मध्ये पुन्हा ते नगरसेवक बनले. नगरसेवक असताना त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. २०१४ मध्ये मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. हा पराभव वगळता ते तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. बनसोडे यांची ज्या ठिकाणी पूर्वी पान टपरी होती, त्याच जागेवर आता त्यांचं जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आलं आहे. 2024 ला पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षपदासाठी दोन ते तीन नावं स्पर्धेत होती. मात्र अखेर अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे.