24 तासांत निर्णय घेण्याची क्षमता फक्त एकनाथ शिंदेंकडेच : डॉ. श्रीकांत शिंदे (संग्रहित फोटो)
पुणे : 24 तासांत निर्णय घेण्याची क्षमता फक्त एकनाथ शिंदे साहेबांकडेच आहे. मुख्यमंत्रिपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय तातडीने घेतले आणि विद्यार्थी व सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
पुण्यातील फडके हॉल येथे शनिवारी (दि.२३) स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने ‘कृतज्ञता सोहळा व विद्यार्थी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विशेष कृतज्ञता सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार बच्चू कडू आदी मान्यवर उपस्थित होते.
रिक्त पदे आणि भरती प्रक्रियेचा पाठपुरावा करणार
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती प्रक्रिया अधिक गतीने सुरू करण्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (MPSC) मनुष्यबळ वाढवून सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून, नगरपरिषद भरती प्रक्रियेलाही लवकरच गती देण्यात येईल.”
तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध
यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. एकनाथ शिंदे यांनी तरुणांवर विश्वास ठेवून माझ्या खांद्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. मंत्रिपद हे केवळ प्रतिष्ठेसाठी नसून लोकांची कामे करण्यासाठी असते. तरुणांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आयोगाचा अध्यक्ष विद्यार्थ्यांच्या अडचणी समजणारा असावा : डॉ. नीलम गोऱ्हे
आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, “स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न आगामी अधिवेशनात आक्रमकपणे मांडले जातील. तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना असायला हवी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) अध्यक्ष हा विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी संवेदनशीलतेने समजून घेणारा आणि त्या सोडविणारा असावा.”
पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी : बच्चू कडू
आमदार बच्चू कडू यांनी परीक्षा पद्धतीतील पारदर्शकतेवर भर दिला. लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, अलीकडच्या काळातील पेपरफुटीचे प्रकार अत्यंत गंभीर असून, यामागील मुख्य सूत्रधार आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांची ‘दांडी’; विद्यार्थी नाराज
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे उपस्थितांमध्ये विविध चर्चांना उधाण आले होते. मंत्र्यांच्या या गैरहजेरीमुळे कार्यक्रमाचे आयोजक आणि उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटल्याचे पाहायला मिळाले.






