राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? ठाकरे गटाचे ५ खासदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण
उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी रविवारी (14 जून) पक्षाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला काही खासदारांनी पाठ फिरवली. तर काहींनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. त्यामुळे ठाकरे गट फुटणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. पण बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी पक्षात कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा करत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
ठाकरे गटात कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा खासदार संजय राऊत करत असले तरी दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीनंतर ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.ठाकरे गटातील काही खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच काल मातोश्रीवरील बैठकीला पक्षाचे पाच खासदार अनुपस्थित राहिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
बार्शी-टाकळी नगरपंचायत आणि अकोट नगरपालिकेतील १५ हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुर आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच काही अपक्ष नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीटाकळी नगरपंचायतीतील अनेक नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.
बार्शीटाकळी आणि अकोटमधील संभाव्य पक्षांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून संघटनात्मक बळकटीसाठी हालचाली सुरू असून, या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता मुंबईतील बैठकीनंतर नेमके किती नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






