पुणे विधानपरिषद उमेदवारीवरून मोठा गोंधळ, विक्रम काकडेंना मिळाली उमेदवारी तर सुनील टिंगरेंची बंडखोरी
महायुतीत झालेल्या जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पुणे या दोन जागा आल्या. यातली कोकणातील जागा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना देण्यात आली आहे. तर पुण्याच्या जागेवरून आता वाद उद्भवला आहे. पुण्यात पार्थ पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. काल रात्री राष्ट्रवादीच्या बैठकीत विक्रम काकडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघड नाराजी दर्शवली. आज पुन्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीत जिजाई बंगल्यावर बैठक पार पडली. दोन तास चाललेल्या या बैठकीत विक्रम काकडेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी संजय काकडे आणि विक्रम काकडे यांचा पक्षप्रवेशही पार पडला. मात्र त्याआधीच या जागेसाठी आग्रही असलेले सुनील टिंगरे बैठकीतून बाहेर पडले आणि थेट राष्ट्रवादी कार्यालय गाठून विधान परिषद उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली.
सुनील टिंगरे हे बैठकीतून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरले. त्यावेली त्यांनी प्रतिक्रिया देत, “मी पुढची तयारी करण्यासाठी पार्टी ऑफिसला चाललो आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार,” असे बोलून ते निघून गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयात ते पोहोचले. विधान परिषदेचा फॉर्म भरायची सुरुवात त्यांनी त्यावेळी केली. तेव्हाच सुनील टिंगरे यांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत उमेदवारीसाठी नाव निश्चित झालेले विउकरं काकडे हेसुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले. तेसुद्धा फॉर्म भरायच्या लागले. यावेळी सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे हे दोघेही समोरासमोर बसून उमेदवारी अर्ज भरत होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील उमेदवारीबाबतचा सावळागोंधळ समोर आला आहे. आता राष्ट्रवादीकडून कोणाला एबी फॉर्म दिला जातो.हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






