रामदास आठवलेंचा महायुतीला इशारा (फोटो- टीम नवराष्ट्र)
कुर्डुवाडी: जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीचे कौतुक करत, “भाजपसोबत आपली युती आहे, पण भाजपकडून आपल्याला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळावर लढण्यास माझी परवानगी आहे. फक्त बौद्धांच्या मतांवर नव्हे, सर्व समाजाला सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने कामाला लागा असा आदेश रिपाइं आ चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिला.
कुर्डुवाडी येथे आयोजित रिपाइं (आ)कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप, राज्य संघटक सुनील सर्वगोड, महाराष्ट्र कार्याध्यक्ष जितेंद्र बनसोडे,प.महाराष्ट्र सचिव चंद्रकांत वाघमारे,जिल्हाध्यक्ष सोमनाथ गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष अमरकुमार माने ,सुरज जगताप, आकश जगताप आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी संभाव्य जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या आगामी भूमिका सांगितल्या. ते म्हणाले, “भाजपसोबत युती असली तरी स्थानिक स्तरावर सन्मान मिळत नसल्याने स्थानिक निर्णय घेण्याचा अधिकार द्यावा.स्थानिक पातळीवर आघाड्या महत्वाच्या असतात याठिकाणी पक्ष एकत्र येत नाहीत तर विचारधारा एकत्र येते. विचारधारा महत्वाची असून आघाड्यांमध्ये योगदान निर्णायक ठरते.
कार्यक्रमाचे संयोजक राज्य उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप म्हणाले गेल्या तीस पस्तीस वर्षात आम्ही इतर पक्षाचा एकही उमेदवार या आमच्या पाच ते सहा वार्डातून निवडून दिला नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना सामवून घेत प्रत्येक समाजाला आम्ही आपल्या रिपाइंच्या माध्यमातून प्रतिनिधित्व दिलेले आहे. आम्ही शहरामध्ये दबाव गट निर्माण केला आहे .आम्हाला रिपाइला विचारल्याशिवाय इथे कोणताच पक्ष राज्य करु शकत नाही. आम्ही कोणाकडे चर्चेला जात नाही. तेच आमच्याकडे चर्चेला येतात. आपल्याला विचारात घेतल्याशिवाय इथे कोणाचाच कोरम पूर्ण होऊ शकत नाही.आपण आमच्या पाठीशी राहिलात तर इथल्या सगळ्या पक्षांना आम्ही धूळ चारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी ना.आठवले यांना दिला.
रामदास आठवले यांची भाषणाला आपल्या मिष्किल शैलीत सुरुवात केली
मी देशभरामध्ये मजबूत करु शकलो माझ्या भीमाचा वाडा,
कारण माझ्या पाठीशी उभा राहिला बापूसाहेब जगताप यांचा माढा..,
आपल्या काळजावर बाबासाहेबांच चित्र काढा आणि संविधान बदलणाऱ्यांना टराटरा फाडा,
साऱ्या देशामध्ये मी फिरवत आहे आरपीआय चा गाडा, अन्याय झाला तर करावा लागेल तुम्हाला राडा.