Amit Shah Pune Visit: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धरपकड
Sanjay Raut News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज पुणे दौऱ्यावर आहेत. पण काँग्रेसने हा दौरा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यावर पुणे दौऱ्यात गोंधळ घातल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपनेही दिला होता. या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या हा इशारा थेट धुडकावून लावला आहे. तुम्ही काय हिंसेच्या गप्पा करता तुमच्या लाठीचार्जनंतरही मुलं क्रांती करायला तयार झाली. तुम्ही आडवे येऊ नका, 2029च्या आधीच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा बाजार उठलेला असेल.” अशा शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेस आणि इतर पक्षांनी आंदोलन करण्याचे ठरवले असेल तर हा त्यांचा अधिकार आहे. भाजपमध्ये हिंसाचार करण्याची हिंमत आहे का, तुमचे पंतप्रधान रात्री 12 वाजता व्हिडिओ टाकतात. मग दिवसा व्हिडिओ टाकायला घाबरता का. तुम्ही हिंसेबद्दल बोलता पण त्या लहान मुलांनी तुम्हाला गुडघ्यावर आणलं, २०२९ मध्ये मोदी आणि शाह सत्तेत नसतील. कदाचित २०२९ पूर्वीच त्यांचा राजकीय बाजार उठलेला असेल.” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओवरही राऊत यांनी निशाणा साधला. “हा व्हिडीओ म्हणजे आणखी एक शरणागती आहे. रात्री व्हिडीओ टाकण्यापेक्षा दिवसा जनतेसमोर या. तुमचे सल्लागार बदला. तुमची मानसिक स्थिती चांगली नाही. जर सरकार विद्यार्थ्यांना माफ करत असेल, तर मग शेकडो विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी का तपासली जात आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी उपरोधिक टीका केली. “दगड गोळा करण्यापासून ते त्यावरील ठसे तपासण्यापर्यंतची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या ‘वैज्ञानिक’ संशोधनामुळे लोक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनाही विसरतील. त्यांना वैज्ञानिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार द्यायला हवा,” असा टोला त्यांनी लगावला.
पुण्यात अमित शाह यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवरही राऊत यांनी निशाणा साधला. “भाजपने अशी होर्डिंग्ज लावणे म्हणजे लाचारीचा कळस आहे. भ्रष्टाचार, गुन्हे आणि खड्ड्यांच्या पैशावर हे सरकार चालत आहे. अमित शाह यांनी लाज वाटली पाहिजे. संसदेत उत्तर द्यायला ते येत नाहीत आणि पुण्यात स्वागत स्वीकारत आहेत,” असे ते म्हणाले.






