'तुकाराम मुंढे फक्त कायद्याचं पालन...'; नितेश राणेंचं मोठं विधान, संजय राऊतांवरही टीकास्त्र
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी त्यांचे समर्थन केले आहे. मुंढे हे कोणतेही वेगळे काम करत नसून, ते केवळ कायदा, शासन नियम आणि शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करत असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
राणे म्हणाले की, महाराष्ट्रात नियमांचे काटेकोर पालन करून काम करणारे अनेक सक्षम आणि प्रामाणिक अधिकारी कार्यरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचीही भूमिका प्रशासनात पारदर्शकता आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्याची आहे. अशा अधिकाऱ्यांमुळेच महाराष्ट्राची प्रगत आणि जबाबदार राज्य म्हणून ओळख अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या भाषणातून आपण अशा सर्व अधिकाऱ्यांचे कौतुकच केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘थोडीशीही लाज उरली असेल तर अमित शाहांचा राजीनामा घ्या’; मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर हल्लाबोल
यावेळी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या टीकेलाही राणे यांनी प्रत्युत्तर दिले. राजकीय वक्तव्य करताना स्वतःच्या राजकीय ताकदीचा आणि मर्यादांचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्याची हिंमत करू नये, असे म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. लोकमान्य टिळक कुटुंबाने अमित शाह यांना दिलेल्या सन्मानाचा उल्लेख करत, त्यावरून तुलना करत टीकाही केली.
अमित शाह यांच्या आगामी पुणे दौऱ्यावेळी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार असल्याच्या घोषणेवरही राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली होती, असा दावा त्यांनी केला. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, काँग्रेसच्या सत्ताकाळातील नीट परीक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित घटनांचाही उल्लेख करत विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना कथित धमक्या मिळाल्याच्या चर्चेवरही राणे यांनी भूमिका स्पष्ट केली. राज्यात कोणालाही धमकी मिळत असेल, तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार आणि पोलीस यंत्रणेची असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, केवळ माध्यमांसमोर आरोप करण्याऐवजी संबंधितांनी अधिकृत तक्रार आणि उपलब्ध पुरावे पोलिसांकडे सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले. योग्य तक्रार प्राप्त झाल्यास पोलीस निश्चितपणे कायद्यानुसार आवश्यक कारवाई करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






