शिवसेना शिंदे गटाचे आमदार फुटणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला (फोटो -सोशल मीडिया)
आमदार आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीमध्ये मोठा स्फोट होणार असल्याचे जाहीर केले. तसेच मुख्यमंत्र्यांना 22 आमदार मिळाले असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेल्या वर्षभराचा अभ्यास केला तर त्या आमदारांनी सांगितलेली सगळी कामे झाली आहेत. त्यांना हवा असलेला फंड दिलेला आहे. त्याशिवाय उठ सांगितले तर उठायचे. उडी मार बोलल्यावर उडी मारायची असं ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागले आहेत. नेमकं कुणी यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे त्यांना कळेल. या २२ मधील एक जण स्वतःला व्हाईस कॅप्टन म्हणतो,” असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
हे देखील वाचा : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा प्रयत्न? मुंडेंनी 2 कोटींची सुपारी दिली असल्याचा केला दावा
इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाल्याने अनेक नेत्यांनी चॅटर्ड विमानांचा वापर केला. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, “काल स्वतः मुख्यमंत्री चार्टर्ड प्लेनने नागपूरात आले. त्यांचे विमान दोनदा मुंबईला गेले. तिथून इतरांना घेऊन आले. दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेनने आले. आज काही आमदार चार्टर्ड प्लेनने आले. सध्या ज्या नगरपंचायत निवडणुका सुरू आहेत त्यात एक मुख्यमंत्री आणि २ बेकायदेशीर उपमुख्यमंत्री हे कुठल्या हेलिकॉप्टरने फिरतायेत? एक उपमुख्यमंत्री जे गद्दार आहेत त्यांच्या गावी जायला रस्ता नाही. २-२ हेलिकॉप्टर गावात जातात. हेलिकॉप्टरमधून ज्या बॅगा घेऊन फिरतायेत त्यात कुठला आनंदाचा शिधा आहे? ३ तासाच्या प्रचारात आनंदाचा शिधा घेऊन जातात आणि वाटतात,” अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
हे देखील वाचा : भास्कर जाधव ठरले ‘ऑपरेशन टायगर’चे शिकार? विरोधी पक्षनेते न मिळताच घेतली शिंदेंच्या नेत्याची हॉटेलमध्ये भेट
वृक्षतोडीवरुनही माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “नाशिकच्या तपोवनमध्ये, ठाण्यातील मानसिक रुग्णालयाच्या परिसरातील, मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क इथली झाडे कापायला लागलीत. देशात प्रत्येक ठिकाणी जिथं पर्यावरण वाचले आहे तिथे विकासाच्या नावाखाली झाडे कापण्याचा प्रकार सुरू आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ठिकाणी खाणी आम्ही बंद केल्या होत्या, भाजपा सरकार आल्यावर पुन्हा कामे सुरू झाली. कुठेही पर्यावरण चांगले ठेवायचे नाही. कुणी जगू शकत नाही अशी परिस्थिती करायची,” असाही घणाघात आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केला.






