शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत (फोटो - सोशल मीडिया)
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथ होत आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते नाराज आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे मागील अनेक दिवसांपासून नाराज होते. ते लवकरच शिवसेना सोडणार असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चेचेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व महत्त्वपूर्ण नेते राजन साळवी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 3 फेब्रुवारी रोजी राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. अनेक नेते नाराज असून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटातील नेते राजन साळवी हे देखील मागील अनेक दिवसांपासून नाराज होते. ते आता मीडिया रिपोर्टनुसार, भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी येत्या तीन तारखेलाच भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही नेत्यांचा महायुतीमध्ये प्रवेश होणार आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तीन माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुभाष बने आणि लांजा राजापूर विधानसभाचे माजी आमदार गणपत कदम लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांची आत्तापर्यंत सातव्यांदा चौकशी करण्यात आली. राजन साळवी यांच्यासह त्यांचे बंधू दीपक साळवी यांनाही या चौकशीसाठी ‘एसीबी’ने नोटीस बजावली असल्याने तेही यावेळी उपस्थित होते. राजन साळवी यांच्याबरोबर इतर घरातील लोकांची देखील चौकशी केली आहे. त्यामुळे कारवाईचा ससेमेरा थांबवण्यासाठी ते शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे आता राजन साळवी हे भाजप प्रवेश करणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राजन साळवी हे पक्ष सोडणार नाहीत असा विश्वास सकाळीच व्यक्त केला होता. खासदार राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सध्या सत्ता आणि पैशाच राजकारण देशभरात सुरू आहे . कार्यवाही आणि भीती यातून हे सर्व होत आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. राजन साळवी आम्हाला सांगत नाहीत काही आणि माझं बोलणं कालच झालं त्यांच्या बोलण्यातून असं काही जाणवत नाहीत. ते वारंवार सांगतात माझ्या डोक्यात अजून असला कुठलाही विचार नाही आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. भविष्याच्या घडामोडी घडतील त्यावर मी भाष्य करेल,” असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते.